prabodhini news logo
Home ठळक बातम्या आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना...

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

0
130

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले.

आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे थेट उत्तरांची मागणी केली. या पाच राफेल विमानांपैकी किती भारताच्या सीमेत कोसळले आणि किती पाकिस्तानात कोसळले, असा सवाल त्यांनी केला. तसेच, जर एखादे विमान पाकिस्तानात कोसळले असेल, तर त्या विमानाचा पायलट कुठे आहे? त्याला परत भारतात आणले आहे का, नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि याबाबत उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी सनातनवाद्यांनाही आवाहन केले की, त्यांनीही हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावेत.

विरोधी पक्षांना उद्देशून त्यांनी सांगितले की, आरएसएस आणि सरकारपासून घाबरण्याची गरज नाही. “जेलमध्ये टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची भीती बाळगून प्रश्न विचारणे थांबवू नका,” असे ते म्हणाले.

आपल्या भाषणात आंबेडकर यांनी वैयक्तिक अनुभव सांगताना असेही नमूद केले की, त्यांना धमक्या देण्यात आल्या; मात्र ते ना घाबरणार, ना झुकणार, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी स्वतःला “फकीर” संबोधत सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही आणि त्यांनी आयुष्यात कधी भ्रष्टाचार केला नाही किंवा लाच घेतली नाही; तरीही ते सत्तेला उघड आव्हान देत आहेत.

परराष्ट्र धोरणावर बोलताना त्यांनी आरोप केला की, भारताचे धोरण अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत आहे. त्यांनी नमूद केले की, इराण सारख्या देशांनी नेहमी भारताची साथ दिली आहे. आर्थिक निर्बंध असतानाही भारताला रुपयांमध्ये तेल देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अशा मित्र देशांशी भारताने निष्ठा राखली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

इस्रायल संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, भारताला त्यांच्या मदतीची गरज नाही, कारण भारतीय सेना आणि वायुदल स्वतः सक्षम आहे. तसेच, अनेक प्रसंगी रशिया ने भारताला मदत केली असून महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे, असा दावाही त्यांनी केला.

आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध कोणत्याही धर्म किंवा ब्राह्मण समाजाविरुद्ध नसून केवळ आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आहे. या आंदोलनाचा चुकीचा अर्थ लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, त्यांनी काँग्रेस, सीपीएम आणि इतर राजकीय पक्षांना आवाहन केले की, या आंदोलनाचे केंद्र दिल्ली बनवावे आणि लाखोंच्या संख्येने लोकांना एकत्र आणून केंद्र सरकारकडून उत्तरांची मागणी करावी. असे झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला.

शेवटी, त्यांनी देशाची स्वातंत्र्य, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जनतेने घाबरू नये आणि पुढील १०-१५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या मुद्द्यांवर उत्तरांची मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

भाषणाचा शेवट त्यांनी “जय हिंद, जय भारत” या घोषणांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here