prabodhini news logo
Home गडचिरोली झिंगानूर गावात OFC केबल तुटल्यामुळे नेटवर्क ठप्प; CPI ची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी...

झिंगानूर गावात OFC केबल तुटल्यामुळे नेटवर्क ठप्प; CPI ची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांना तात्काळ दुरुस्तीची मागणी

0
145

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात महाआयटीची (MahaIT) OFC (ऑप्टिकल फायबर केबल) तुटल्यामुळे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे व्यंकटापूर व झिंगानूर येथील बीटीएस (BTS) टॉवर पूर्णपणे बंद पडले असून, हा टॉवर हब साईट असल्याने आजूबाजूलच्या अनेक गावांवर याचा परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केबल तुटल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची कामे, व्यावसायिकांचे व्यवहार तसेच बँकिंग सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे यावर गंभीर परिणाम झाला आहे. आपत्कालीन सेवांसाठी संपर्क साधणेही अवघड झाले आहे.
या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) गडचिरोली जिल्हा कोन्सिल ने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, महाआयटी यांना एक तात्काळ निवेदन पाठवले आहे. जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी स्वाक्षरीत केलेल्या या पत्रात संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षातर्फे तीन मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या अशा की, १) तुटलेल्या OFC केबलची तात्काळ दुरुस्ती करून नेटवर्क सेवा पूर्ववत सुरू करावी, २) वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि ३) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षितता उपाय व नियमित देखभाल सुनिश्चित करावी.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी चेतावनी दिली की, जर तात्काळ याकडे लक्ष दिले गेले नाही आणि दुरुस्ती करण्यात आली नाही, तर नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here