
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दि. २९ मार्च २०२६ रोजी अमरावती येथे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणि सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या मंदा बोरकर-रत्नपारखी यांना अमरावती येथे मानाच्या ‘स्त्री सन्मान पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.
ह्युमॅनिटी एज्युकेशनल अँड मल्टि सोसायटीच्या वतीने या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवा देतानाच समाजातील वंचित घटकांसाठी मंदा बोरकर यांनी केलेले उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अमरावती येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. हसीना शाह यांच्या हस्ते मंदा बोरकर यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आरोग्य विभागात कार्यरत राहूनही त्यांनी आपला सामाजिक कार्याचा वसा सुरू ठेवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या सन्मानाबद्दल बोलताना मंदा बोरकर यांनी, हा पुरस्कार माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असून यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा रुग्णालय आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















