prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला!

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ : २९ दिवस तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा संताप उसळला!

0
139

पगार, १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीच्या पुर्वी जमा न केल्यास, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर कामगार आपल्या कुटुंबांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करणार

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मिरज, दिनांक ११/०४/२०२६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे कार्यरत “२९ दिवस तत्त्वावरील न्यायालयीन चतुर्थश्रेणी बदली” कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ११ एप्रिल २०२६ पर्यंतही पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन कामगार कायद्यांचे उल्लंघन?
नवीन कामगार कायद्यांनुसार, कामगारांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणे बंधनकारक आहे. मात्र, या स्पष्ट तरतुदीला केराची टोपली दाखवत प्रशासनाने ११ एप्रिल उलटूनही वेतन न दिल्याने हा थेट कायद्याचा भंग असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आर्थिक अडचणीत कामगार कुटुंबे
दरमहा १ तारखेपर्यंत वेतन जमा होणे अपेक्षित असताना, यावेळीही प्रशासनाकडून विलंब झाल्याने कामगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बहुसंख्य कर्मचारी वंचित, बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असून, त्यांचा एकमेव उदरनिर्वाहाचा आधार हा मासिक पगार आहे.
जयंतीपूर्वी घरगुती खर्च भागवण्यासाठी तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अग्रिम वेतनाची मागणी केली होती; मात्र ना अग्रिम मिळाले, ना नियमित वेतन!

पुन्हा ‘जयंती’तच विलंब — संशय अधिक गडद
मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या काळात वेतन उशिरा देण्यात आले होते. यंदाही तोच प्रकार घडल्याने हा विलंब जाणीवपूर्वक असल्याचा संशय कामगारांत व्यक्त होत आहे.

कायद्याचा बडगा उगारला
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 336, 337, 342 आणि 351 लागू होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. पदाचा दुरुपयोग, हक्कांचे उल्लंघन, आर्थिक नुकसान घडविणे आणि भेदभाव यांसारख्या गंभीर बाबींचा यात समावेश होऊ शकतो.

१४ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा
“वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन”ने प्रशासनाला थेट इशारा देत १४ एप्रिल २०२६ रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे.

आंदोलनाचा आराखडा :
ठिकाण — अधिष्ठाता कार्यालय, मिरज
वेळ — सकाळी १० वाजता
दिनांक — १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)

कार्यक्रमात समावेश :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन
भारतीय राज्यघटनेचे सामूहिक वाचन
कर्मचारी व कुटुंबीयांसह शांततामय धरणे आंदोलन

मुख्य मागण्या :
* थकित वेतन १४ एप्रिलपूर्वी तात्काळ जमा करावे
* वेतन विलंबाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
* वारंवार होणारा वेतन विलंब थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी
* कामगारांच्या प्रश्नांवर लेखी उत्तर द्यावे
* प्रशासनावर जबाबदारीचा ठपका

“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १४ एप्रिलचे आंदोलन अपरिहार्य असेल. त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील,” असा स्पष्ट इशारा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे.

मिरजमधील वैद्यकीय व्यवस्थेचा कणा असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळणे ही केवळ प्रशासकीय चूक नसून थेट कायद्याचे उल्लंघन आणि मानवी संवेदनशीलतेलाही धक्का देणारी बाब आहे. आता प्रशासन या प्रश्नावर तातडीने निर्णय घेते की आंदोलनाला सामोरे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here