prabodhini news logo
Home चंद्रपूर पालकमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पालकमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
64

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौर संगिता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला पालकमंत्री डॉ. वुईके यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आजचा दिवस केवळ जयंती उत्सव नाही तर डॉ. आंबेडकरांचा संघर्ष तसेच त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. भारतीय संविधानामुळेच सर्व नागरिकांना समान हक्क, न्याय, समता, बंधुता यांच्यासोबतच मुलभुत अधिकार आणि कर्तव्ये मिळाली आहेत. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज मी येथे आपल्यासमोर उभा आहे. राज्य शासनाने आरक्षण वर्गीकरणाचा विषय जनतेच्या चर्चेसाठी ठेवला असून त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर नक्कीच सकारात्मक निर्णय शासन घेईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जयंती केवळ एक दिवस नाही तर 365 दिवस योग्य कृती करणे, हे डॉ. आंबेडकर यांना खरे अभिवादन राहील. त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने स्मरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तुला स्मारक बनविण्याचे सौभाग्य मला मिळाले. चंद्रपूर हा डॉ. आंबेडकरांच्या विचारावर उत्तम काम करणारा जिल्हा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, 140 कोटीच्या जनतेला संविधानाने एकसंघ ठेवले आहे. आज मानवतेचा संकल्प करण्याचा दिवस आहे. येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून यापैकी 57 कोटी मंजूर झाले आहे. उर्वरीत निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी महापौर संगिता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, माजी मंत्री हंसराज अहीर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here