prabodhini news logo
Home गडचिरोली भटपार परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात १५ एप्रिलपासून बेमुद्दत लक्षवेधी आंदोलन सुरू -भाकपा

भटपार परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात १५ एप्रिलपासून बेमुद्दत लक्षवेधी आंदोलन सुरू -भाकपा

0
77

एटापल्ली प्रतिनिधी : भामरागड तालुक्यातील भटपार परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, तसेच मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने दिनांक १५ एप्रिल २०२६ पासून बेमुद्दत लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या संदर्भात तहसीलदार, भामरागड यांना निवेदन देण्यात आले असून, भटपर ते दर्भा तसेच भटपर ते घोटपाडी या मार्गांची अवस्था अतिशय खराब जंगल रस्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय होऊन वाहतुकीस पूर्णतः अयोग्य ठरतात, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बस सेवा नियमित नसल्याने शिक्षण आणि आरोग्य सुविधा दोन्ही बाधित होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेणेही कठीण बनले आहे.

भाकपच्या वतीने प्रशासनावर आरोप करण्यात आला आहे की, मोठ्या कंपन्या व उद्योगांच्या कामांना प्राधान्य दिले जाते, मात्र सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक वेळा मागण्या करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, कॉ. सुरज जककुलवार, कॉ. विशाल पूजजलवार व समस्त गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मुख्य मागण्या:

1. भटपार ते दर्भा मार्गाचे पक्के डांबरीकरण तात्काळ मंजूर करून काम सुरू करावे.
2. भटपार ते घोटपाडी मार्गावर पावसाळ्यापूर्वी मुरुम रस्ता तयार करावा.
3. भटपार परिसरात नियमित एसटी बस सेवा सुरू करावी.

जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस आश्वासन व मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन शांततामय पद्धतीने करण्यात येणार असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही भाकपने स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here