



आमदार धर्मरावबाबा आत्राम व भाग्यश्री, तनुश्री आत्राम यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या (KGBV) विद्यार्थिनींनी १० वीच्या परीक्षेत मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचा सत्कार सोहळा सिरोंचा येथेच मोठ्या उत्साहात पार पडला.
भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार ना. धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.
१५ मे २०२६ रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानासोबतच शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्यात आले. सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील खालील विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला:
कु. स्वाती दशरू लावडे: ८४.४०% (विद्यालयात प्रथम)
कु. वनिता चंद्रय्या दागम: ८०.४०% (विद्यालयात द्वितीय)
कु. रितीषा रमेश कोंडा: ८०.४०% (विद्यालयात द्वितीय)
याप्रसंगी बोलताना आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, “आपल्या सिरोंचा तालुक्यातील मुली आज शिक्षणात अव्वल येत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. कस्तुरबा गांधी विद्यालयाने मुलींना घडवण्याचे उत्तम कार्य केले आहे.” भाग्यश्री आत्राम यांनी विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सिरोंचा येथेच हा गौरव सोहळा झाल्याने स्थानिक स्तरावर विद्यार्थिनींचे मोठे कौतुक होत आहे.















