
एका बेडवर दोन रुग्ण, नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली येथील जिल्हा महिला रुग्णालयात सध्या आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून, रुग्णसंख्येचा प्रचंड भार वाढल्याने महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. १०० रुग्णांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या ३०० ते ३५० रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे अनेक गर्भवती आणि इतर महिला रुग्णांना खाली जमिनीवर झोपावे लागत आहे, तर एकाच बेडवर दोन-दोन रुग्णांना ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
रुग्णालयातील परिस्थिती गंभीर:
वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालयातील कर्मचारी आणि स्टाफची संख्या अत्यंत अपुरी आहे. कमी मनुष्यबळामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही परिस्थिती महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकप्रतिनिधी व संघटना आक्रमक:
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सीमा कन्नमवार आणि उपसभापती शिल्पा गवारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन दिले आहे. तसेच, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष भूषण खेडेकर आणि तालुका सचिव राणी गोपशेटवार यांनीही या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
प्रमुख मागण्या:
रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे प्रलंबित असलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची संख्या वाढवावी.
रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी.
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबणार नाही. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















