
“पर्यटनावर कोट्यवधी, पण सुरक्षेसाठी निधी नाही”; वनविभागाच्या धोरणांवर सडकून टीका
सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला करून चार महिलांचा बळी घेतल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र ब्रिगेडच्या नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात धाव घेत वनविभागाच्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी डॉ. गावतुरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तीव्र निषेध करत २५ लाखांचा प्रतीकात्मक धनादेश सादर केला. “जर वनविभागाला मानवी जीवाची किंमत फक्त २५ लाख रुपये वाटत असेल, तर हा चेक घ्या आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः वाघासमोर उभे राहावे,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, वनविभाग जंगल पर्यटन, सफारी आणि विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करतो, मात्र जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. वाघांचा वाढता वावर, वारंवार होणारे हल्ले आणि स्थानिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका याकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
डॉ. गावतुरे यांनी मृत महिलांच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा, कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, गुंजेवाही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महिलांमध्ये आणि शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.















