
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व इच्छुक कार्यकर्त्यांना वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, निवडणूक आयोगाने विधान परिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. तर मतदान प्रक्रिया १८ जून २०२६ रोजी पार पडणार आहे.
या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज तातडीने मागविण्यात आले असून संबंधित माहितीसह अर्ज २५ मे २०२६ पर्यंत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे सादर करण्यात यावे असे आवाहन माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना केले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.















