
गोंडपिपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतजमीन अधिग्रहणाच्या नावाखाली सुरू असलेल्या सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी परिषदेला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. परिषदेत उमटलेला जनक्षोभ हा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे.
“जमीन ही शेतकऱ्यांची आई आहे, तिचा सौदा होऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी अधिग्रहणाला जोरदार विरोध दर्शविला. विकासाच्या नावाखाली बळीराजाला त्याच्या हक्काच्या जमिनीवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला.

परिषदेदरम्यान एका वयोवृद्ध शेतकरी महिलेनं व्यक्त केलेला संताप आणि तिच्या डोळ्यातील अश्रू उपस्थितांच्या मनाला चटका लावणारे ठरले. “सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर हा संघर्ष आणखी तीव्र होईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
दरम्यान, संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची साथ न दिल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी क्षेत्रीय आमदारांविरोधात गावबंदीचा ठराव पारित केला. हा निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात जनतेने दिलेला मोठा इशारा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शेतकरी परिषदेनंतर आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “ही तर फक्त सुरुवात आहे. सरकारने तातडीने जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर हा लढा संपूर्ण जिल्ह्यात पेटेल,” असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.
“ज्या शेतकऱ्याच्या बळावर सरकार सत्ता उपभोगते, तोच बळीराजा रस्त्यावर उतरला तर मोठमोठ्या सत्ताधीशांची सिंहासनेही डळमळीत होतात,” अशा शब्दांत परिषदेत सरकारला इशारा देण्यात आला.















