
सिंदेवाही तहसील कार्यालयात निवेदन सादर
सिंदेवाही प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – देशाचे केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी दिल्ली येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात आदिवासी समाजाचा उल्लेख “वनवासी” असा केल्याच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी अमित शाह यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
मंगळवार, दि. ३ जून २०२६ रोजी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबलच्या वतीने सिंदेवाही तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांमार्फत हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी मेळाव्यात देशभरातून लाखो आदिवासी सहभागी झाले होते. या मेळाव्यादरम्यान गृहमंत्र्यांनी आदिवासींना “वनवासी” संबोधल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून देशभरात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी संघटनेच्या वतीने बंजारा समितीचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत करू नये, तसेच संबंधित समिती बरखास्त करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदन देताना रवी आडे, दिवाकर मसराम, संजय कोवे, राजू ताडाम, सुनील पेंदाम, मनोहर आत्राम, अरुण कुंबरे, नामदेव सुरपाम, अरुण पेंदाम, बंडू वेठे, हर्षित कोवे, तनुश्री पेंदाम, नरेश मडावी, देविदास मडावी, नितीन मडावी, चंद्रशेखर सलामे, प्रकाश कोयताडे, निलेश वेठे, आशिष पोर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते.
सदर मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.















