
खेलो इंडिया केंद्रातील दोन खेळाडूंना कांस्यपदक; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – दि. 04 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या खेलो इंडिया केंद्रातील दोन महिला खेळाडूंनी पुणे येथे आयोजित वरिष्ठ गट राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
या स्पर्धेत कु. श्रेया इथापे हिने 100 मीटर हर्डल्स प्रकारात कांस्यपदक पटकाविले, तर कु. अंकिता चव्हाण हिने तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदक मिळवून राज्यस्तरावर आपली छाप पाडली. त्यांच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्याच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे.
या यशस्वी खेळाडूंचा गौरव करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा खेलो इंडिया केंद्राच्या अध्यक्षा वसुमना पंत यांच्या हस्ते 3 जून रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खेळाडूंच्या कठोर परिश्रमांचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याच प्रसंगी खेलो इंडिया केंद्रातील खेळाडूंना वर्षभर पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केलेल्या विनंतीस जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी प्रदान केली. या निर्णयामुळे खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून त्यांच्या क्रीडा क्षमतेला अधिक बळ मिळणार आहे.
खेलो इंडिया केंद्रातील खेळाडूंच्या या यशामागे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, मैदानी क्रीडा प्रशिक्षक रोशन भुजाडे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संपूर्ण टीमचे मार्गदर्शन, नियोजन आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.















