Home ठळक बातम्या भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२...

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त, राज्यभरात १९२ जणांना अटक

0
53

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी धडक कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त पनीर, खवा, तूप आणि चीजसदृश पदार्थांच्या संशयावरून तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून राज्यभरातील कारवाईत १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या धाडीत ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जप्त केलेल्या साठ्यात २,८०६ किलो पनीर, १३,१२७ किलो खवा, १३८ किलो चीज अॅनालॉग आणि ९६० किलो तूप यांचा समावेश असून सर्व नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्येही तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ३८ हजार रुपयांचा संशयित साठा जप्त दरम्यान, १ ते ५ जून या कालावधीत राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक पदार्थांविरोधात १९५ छापे टाकण्यात आले. या मोहिमेत १ कोटी ९९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धाराशिव, समृद्धी महामार्ग आणि धुळे येथील कारवाईतही कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांवर अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भेसळखोरांविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here