
भुसावळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरातील स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, प्रकल्पग्रस्त आणि प्रदूषणग्रस्त गावांच्या नागरिकांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी भव्य दीपनगर रोजगार हक्क मोर्चा आणि दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनातून स्थानिकांच्या रोजगार हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मोर्चाला सुरुवात झाली. शेकडो कार्यकर्ते, युवक, महिला आणि शेतकरी यांच्या सहभागाने निघालेला मोर्चा दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरात पोहोचला. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांना प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. शेती उत्पादन घटणे, आरोग्यविषयक समस्या वाढणे आणि पर्यावरणीय हानी अशा परिणामांना स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, या सर्वाचा भार सहन करूनही रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक युवकांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
साकरी, जाडगाव, मन्यारखेडा, निंभोरा, फुलगाव, वरणगाव, दीपनगर, फेकरी, कंडारी, रायपूर, रणगाव, तासखेडा, उदळी आदी गावांतील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेत आपल्या मागण्यांना पाठिंबा दिला.
मोर्चादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे निराकरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आणखी व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. प्रदूषण आणि विकासाच्या नावाखालील सर्व परिणाम स्थानिकांनी सहन करायचे, पण रोजगाराच्या संधी मात्र बाहेरील लोकांना द्यायच्या, हे अन्यायकारक आहे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार आणि महिला आघाडीच्या पल्लवी गुरचळ यांनी केले. याप्रसंगी सुनीता पालवे, प्रमिला बोदडे, ईश्वर लहासे, संगीत खरे, रुपेश साळुंखे, नवनीत गायकवाड, गणेश इंगळे, प्रीती तायडे, नीता सोनवने, अरुणा दाभाडे, साधना वानखेडे, शाहरूख कुरेशी, निलेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, महिला, शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिक तसेच विविध गावांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.














