
शहर विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
चंद्रपूर : शहरातील विविध विकासकामे, मान्सूनपूर्व तयारी, सिव्हरेज प्रकल्प, अमृत योजना, वीजपुरवठा, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त नरेश अकुनुरी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दारव्हेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त टाले, स्वच्छता निरीक्षक अमोल शेडकी, उपअभियंता आशिष भारती तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गटनेते शेखर शेट्टी, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नामदेव डाहुले, मनोज पाल, संजय तिवारी, विवेक बोढे, आशिष मासिरकर, प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, तुषार सोम, गणेश पिंपळकर, मधू तिवारी, निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, घुग्घूस नगर परिषद गटनेत्या मीना मोरपाका, नगरसेविका शीतल गुरुनुले, आशा देशमुख, अनुजा तायडे, ज्योती जीवने तसेच नगरसेवक भालचंद्र दानव, नगरसेवक रॉबिन बिश्वास, राकेश नाकाडे, प्रलय मशाखेत्री, सतीश तायडे, चंद्रशेखर देशमुख, धनराज जीवने, करण नायर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला शहरातील मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यात आला. नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन, पाणी साचणाऱ्या भागांची ओळख तसेच पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
त्यानंतर शहरातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची समीक्षा करण्यात आली. मंजूर कामांची प्रगती, निधीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि कामांच्या अंमलबजावणीतील अडथळे यावर सविस्तर चर्चा झाली. रखडलेली आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीत चंद्रपूर शहरातील आणि घुघुस येथील नजूल जागेवरील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. विशेषतः १५०० चौ. फूटांपेक्षा अधिक जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या प्रश्नांवर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर मार्ग काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच घुघुस नगर परिषद नव्या ईंमारती बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीत शहरातील भुयारी गटर (सिव्हरेज) योजनेचाही विशेष आढावा घेण्यात आला. सिव्हरेज प्रकल्पाच्या कामांची प्रगती, पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची स्थिती तसेच योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या नव्या रस्ते बांधकामांबाबत माहिती सादर करण्यात आली. कामे करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेऊन दर्जेदार कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही प्रगती अहवाल तपासण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुस्थितीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
शहरातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा तसेच पावसाळ्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. संभाव्य वीज खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत आगामी महाकाली महोत्सव २०२६ संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. महोत्सवादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुष आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीच्या विषयावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंडवाना साम्राज्याच्या शूर आणि पराक्रमी राणी हिराई, हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणी संदर्भात प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.
या अनुषंगाने पीडब्ल्यूडी विश्रामगृह परिसरात राजमाता जिजाऊ, बाल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांसाठी योग्य जागा निश्चित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच बंगाली कॅम्प परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून गंज वॉर्ड येथे राणी हिराई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे.
या सर्व स्मारकांच्या उभारणीमुळे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर वारशाला अधिक बळकटी मिळणार असून भावी पिढीला प्रेरणा देणारी ही स्मारके ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सदर प्रस्तावित स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.















