Home ठळक बातम्या नाशिक : द्वारका उड्डाणपुलावर रॉंग साईडचा थरार; स्कूल बस-विंगरची भीषण धडक, अनेक...

नाशिक : द्वारका उड्डाणपुलावर रॉंग साईडचा थरार; स्कूल बस-विंगरची भीषण धडक, अनेक प्रवासी जखमी

0
7

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज, नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रॉंग साईडने येणाऱ्या स्कूल बसमुळे भीषण अपघात घडला. या अपघातात विंगर टेम्पो ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 15 ईएफ 0158 क्रमांकाची स्कूल बस द्वारका उड्डाणपुलावरून उलट्या दिशेने, म्हणजेच रॉंग साईडने एनडीसीसी बँकेच्या बाजूने खाली उतरत होती. त्याचवेळी द्वारकाच्या दिशेने येत असलेल्या एमएच 20 बीसी 7264 क्रमांकाच्या विंगर टेम्पो ट्रॅव्हल्सची बसला समोरासमोर जोरदार धडक बसली.
धडक इतकी जबरदस्त होती की विंगरमधील काही प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे काही काळ उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
दरम्यान, द्वारका उड्डाणपुलावर वारंवार रॉंग साईडने वाहन चालविण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here