विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध
संत्री, कापसाच्या बोंडांची माळ घालत सरकारविरोधात घोषणाबाजी
बळीराजाला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे विधिमंडळ परिसरात लक्षवेधी आंदोलन
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
नागपूर प्रतिनिधी
नागपूर,७ :- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी करत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
आजपासून राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून सोडला.
सरकार विरुद्ध हल्लाबोल करताना विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेट्टीवार म्हणाले, बळीराजा अवकाळीने त्रस्त असताना सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असून त्यांच्याशी निष्ठुर सारखे वागत आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध ताशेरे ओढत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर वडेट्टीवार यांनी सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी देखील केली. याप्रसंगी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, जयंत पाटील, अनिल देशमुख, सुनील प्रभू, यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी हातात निषेधाचे काळे फलक हाती घेत खोके सरकार हाय हाय , शेतकरी झाला कासावीस खोके सरकार ४२० अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवताना विरोधक आक्रमक झाले होते.

