
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पशुपालनाने आपली उपयोगीता सिद्ध केलेली आहे. ग्रामीण भागात शेळीपालन व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक उन्नती होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक तथा प्रकल्प प्रमुख डॉ. अनिल भिकाने यांनी केले. व्यासपीठावर अध्यक्षीय स्थानी मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड हे होते. माफसू, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘महाराष्ट्रातील शेळी व कुक्कुटपालन करणा-या महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पशुसखी व प्रशिक्षक महिलांचा क्षमता विकास’ या प्रकल्पाअंतर्गत दि.१५ ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे पशुसखींसाठी ‘शेळीपालन’ या विषयावर दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल भिकाने यांनी पशुसखींचे पशुसंवर्धनातील योगदान आणि अपेक्षित भूमिका यावर उपस्थित पशुसखींना मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी पशुसखींचे सहयोग आणि समर्पन आवश्यक आहे. जेणेकरून शेळीपालन विषयी अधिकाधिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात होईल.
उद्घाटन कार्यक्रमास मुंबई येथून महिला आर्थिक विकास महामंडळाचे उप-व्यवस्थापक अमृत इंगळे आणि परभणी येथून प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख आभासी पद्धतीने उपस्थित होते. प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि प्रकल्प व प्रशिक्षणाबाबत उपस्थित पशुसखींना अवगत केले. प्रकल्प समन्वयक डॉ.धनंजय देशमुख आणि अमृत इंगळे यांनी प्रसंगी दूरस्थ पद्धतीने पशुसखींना समयोचित मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. शरद आव्हाड, प्रशिक्षण सह-समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. संदीप ढेंगे यांनी केले. यावेळी डॉ.राम कुलकर्णी प्रशिक्षण सह-समन्वयक, डॉ. मत्स्यगंधा पाटील, वसतीगृह नायक यांचेसमवेत इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














