सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदार संघ असलेल्या पोंभुरणा येथील ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधांचा मोठा अभाव असून या रुग्णालयात डॉक्टर, औषधी, सोनोग्राफी मशीन, रक्त तपासणी मशीन व औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. तर रुग्णवाहिका नसल्यानं मृतदेह नेण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना ट्रॅक्टर, ट्राली चा वापर करावा लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून पालकमंत्री मुनगंटीवार यांनी तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा उलगुलान संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा गंभीर इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.
पोंभूर्णा शहर व परिसरातील अनेक गावातील नागरिक या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.मात्र एखाद्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या रुग्णाला घरी नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नसणे ही दुर्दैवी बाब आहे.तर या रुग्णालयात डॉक्टरांची व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. इतकेच नाही तर सोनोग्राफी, रक्त तपासणी व औषधांचा तुटवडा आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कित्येकदा निधी दिल्याचे सांगितले जाते मात्र त्यांच्याच मतदारसंघात रुग्णालयाची अशी अवस्था असल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी जायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.त्यामुळं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून घ्या अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी रुग्णालयात जाऊन राजू झोडे यांनी रुग्णालयाची पाहणी करत उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राजु झोडे श्याम झिलपे जयपाल गेडाम रूपेश निमसरकर पंचशील तामगाडगे आदि उपस्थित होते.

