धुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश
धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४)- धुळे दिनांक:- ०१/१०/२०२४- धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने आणि पाठपुराव्यामुळे धुळे येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिर या संस्थेस धुळे ग्रामीण मतदार संघातील लळींग येथे जमीन मंजूर करण्यात आली आहे. तब्बल 25 एकर जागेवर जागतिक दर्जाचे स्वामीनायण संकुल उभाण्यात येणार आहे. परिणामी आ.पाटील यांच्या संकल्पनेमुळे धुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार असून तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे तालुक्याचा धार्मिक,ऐतिहासिक,शैक्षणिक,सांस्कृतिक असा विविधांगी विकास साधला जावा आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाचे नाव जागतिक नकाशावर कोरले जावे यासाठी आ.कुणाल पाटील हे नेहमीच कार्यशील असतात. त्याअनुषंगाने धुळे तालुक्यातील लळींग येथे बीएपीएस स्वामीनारायण मंदिर संस्थेच्यावतीने एक ऐतिहासिक व धार्मिक स्थळ उभारले जावे अशी संकल्पना आ.कुणाल पाटील यांनी मांडली होती. त्यानुसार लळींग ता.धुळे येथे जागतिक दर्जाचे संकुल उभारण्यासाठी धुळ्यातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिर या संस्थेच्यावतीने जागेसाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला,त्याकरीता आ.कुणाल पाटील यांनी जिल्हा पातळीपासून तर मंत्रालयीन स्तरापर्यंत पाठपुरावा सुरु केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. आ.कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे सोमवार दि.30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस सुमारे 25 एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. आ.कुणाल पाटील यांनी पाठपुरावा केल्याने जागा मंजुर करुन दिली त्याबद्दल बीएपीएस स्वामीनारायण मंदिर धुळेचे कोठारी संत पूज्य आनंदजीवन स्वामी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जागतिक दर्जाचे मंदिर व संकुल (चौकट) –
आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने लळींग ता.धुळे येथे तब्बल 25 एकर जमीन मंजूर करण्यात आली असून या जागेवर जागतिक दर्जाचे स्वामीनारायण मंदिर व संकुल उभारले जाणार आहे. त्यात स्कूल, कॉलेज, मंदिर, निवासव्यवस्था उभारले जाणार आहे. अमेरीकेच्या धर्तीवर मंदिराचीही उभारणी केली जाणार आहे. तसेच सामाजिक विकास, धार्मिक, गोसेवा असे विविध उपक्रमही येथे राबविले जाणार आहेत. जागतिक दर्जाचे स्वामीनायण संकुल उभारले जाणार असल्याने धुळे तालुक्याचे नाव जगाच्या नकाशात सुवर्ण अक्षरांनी लिहीले जाणार आहे. दरम्यान तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.

