“धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकास पुरस्कार.
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (मुंबई) या प्रसिद्ध संस्थेतर्फे ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा’ आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना श्रीस्थानक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावर्षी राज्यभरातील एकूण ३५९ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील एकूण १४ साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘धरती आबा: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ‘ या नाट्यकृतीची नाट्यलेखनाच्या प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी सरस्वती साहित्य पुरस्काराने सन्मानित व दलित साहित्य चळवळीत अग्रक्रमी मानाचे स्थान असलेले,’अक्करमाशी’ ‘उपल्या’ इ. साहित्याने संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे हस्ते, ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त व प्रसिद्ध साहित्यिक दा. कृ. सोमण, अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांचे उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ” धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकाचे लेखनासाठी “श्रीस्थानक साहित्य पुरस्कार -२०२३” या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने साहित्य परीक्षक महादेव गायकवाड, किरण बर्डे, संजीव फडके, निर्मोही फडके, सदाशिव टेटविलकर, शुभांगी गान, र. म. शेजवलकर, निशीकांत महाकाळ, दा.कृ. सोमण, वृंदा दाभोळकर, मानसी जोशी, अस्मिता चौधरी, वृषाली राजे, प्रतिभा चांदूरकर, दुर्गेश आकुरकर, चांगदेव काळे (कार्याध्यक्ष) इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माहे फरवरीमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सौ. तारा भवाळकर यांचेसह विजेते साहित्यिक झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे, प्रतिभा सराफ, गीतेश शिंदे, ऋषिकेश गुप्ते, अंजली जोशी, डॉ.उदय निरगुडकर, गजानन देवधर, पांडुरंग बलकवडे, डॉ. पद्माकर गोरे, श्रीधर दीक्षित, डॉ. गिरीश पिंगळे, शुभदा सुरंगे, लक्ष्मीकांत धोंड इ. साहित्यिकांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिद्ध साहित्यिका निर्मोही फडके यांनी केले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या नाटकाला यापूर्वी साहित्य प्रज्ञामंच, पुणे या संस्थेचेही नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ. प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, प्रा. यादव गहाणे, मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, तसेच इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

