छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कमिशनखोरांना धडा शिकवा
मी सदैव तुमच्या सुख दुःखाचा साथी; – विजय वडेट्टीवार
जनसेवा व संपूर्ण क्षेत्र विकासाकरिता पुन्हा एकदा संधी द्या
आयोजित सभा व महारॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थीती
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर – महाराष्ट्र राज्याशी आमच्या छत्तीसगड राज्याचे अतिशय जवळचे नाते आहे. संतांच्या या पावन भूमीला, छत्रपती शिवाजी महाराज, थोर क्रांतिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांचा वारसा लाभला. मात्र महाराष्ट्र द्रोही भाजपवाल्यांनी सत्ता कारणासाठी महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम केले. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मिती कार्यातही कमिशन खोरी केली. अशा महापापी सत्तापिपासुंना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सजग राहावे. ही लढाई स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. असे प्रतिपादन छत्तीसगड राज्याची माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नामांकन दाखल प्रसंगी ब्रम्हपुरी येथे आयोजित सभेत बोलत होते.
आज महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामांकन दाखल केले. तत्पूर्वी पार पडलेल्या सभेस छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंश बघेल, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान, काँग्रेसचे ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकार,डॉ.राजेश कांबळे,विलास विखार,दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड. गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांची पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यापुढे बोलताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भाजपवाल्यांनी सत्ता प्राप्तीसाठी आमदारांचा बाजार भरवून खोके देऊन त्यांची खरेदी केली. इथले उद्योग पळविल्या गेले. प्रचंड बेरोजगारी व महागाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. हे महायुतीचे प्रचंड मोठे पाप असून महाराष्ट्रातील महायुती ही महाराष्ट्र द्रोही आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तर संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र सुपुत्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधी बाकावर बसून किल्ला लढविला. या महाराष्ट्राने लोकसभेत मोदींना पराभवाची धूळ चारून ट्रेलर दाखविला आगामी विधानसभेत या महायुतीला संपूर्ण पिक्चर दाखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीचे ब्रह्मपुरी विधानसभेचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून केलेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला. तसेच भाजपात एकनिष्ठ व्यक्तींची काय गत होते यावर बोलतं माजी आमदार देशकरांना मिळालेले महामंडळाचे उपाध्यक्ष पद याचे उदाहरण दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी सामान्यातून आलेला माणूस म्हणूनच सामान्यांची वेदना जाणतो. मी क्षेत्रातील जनतेच्या प्रत्येक सुखा दुःखात सहभागी होऊन आज विजयकिरण फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथम स्तरावरील कर्करोग निदान करणाऱ्या फिरत्या दवाखान्यातून हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. क्षेत्रात रस्ते, विज व शेतीसाठी मुबलक पाणी यासह अनेक लोक उपयोगी कार्य केले. लाडकी बहीण योजना ही महायुतीची दिशाभूल करणारी चाल असून आम्ही सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेच्या तसेच घरकुल निधीत दुपटीने वाढ करू. आपण सतत मला प्रेम दिले. यावेळी उर्वरित क्षेत्राचा विकास व जन समस्याचे समूळ निराकरण करण्याकरिता जनसेवेची पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. तर लोकसभेत ज्या पद्धतीने आपण संविधान वाचवण्यासाठी भरभरून साथ दिली अगदी त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेतही महाविकास आघाडीच सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन उपस्थितांना गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी केले. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यन्त महारॅली काढून नामांकन दाखल करण्यात आले. यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रांतील सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी टाक्यातील हजारोंचा संख्येने जनसमुदायाने लक्षणीय हजेरी लावली होती.

