गडचिरोली प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज – आज दि. १३ जून २०२५ : भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JUGA) अंतर्गत दिनांक १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील ४११ गावांमध्ये संतृप्ती शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरांचे उद्दिष्ट अनुसूचित जमातीच्या नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविणे आणि या योजनांबाबत जनजागृती करणे हे आहे. संतृप्ती शिबीरामध्ये खालील सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत :
नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती
मतदार ओळखपत्र काढणे व अद्ययावत करणे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळविणे, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड व सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी रेशन कार्ड बनविणे, बँक खाती उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकारणे, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड आणि किसान क्रेडीट कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकारणे, वनधन विकास केंद्राशी संबंधित लाभ मिळवणे, सौर ऊर्जा व स्वयंपाक गॅस कनेक्शन मिळविणे, विमा योजनांची नोंदणी, सिकलसेल व अॅनेमिया तपासणी (आरोग्य विभागामार्फत)
या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सशक्तीकरणाला गती देण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी केले आहे.

