
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर:-विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांढरी चंद्रपूरच्या वतीने ताडाळी ग्रामपंचायतचे परिसरात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा चंद्रपूरचे कार्याध्यक्ष मा. पी. एम. जाधव यांचा जादूटोणा विरोधी कायदा, फसवी बुवाबाजी, चमत्कारामागिल विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डॉ विश्वास मॅडम यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. डॉ. विश्वास मॅडम यांचे हस्ते पाण्याने पेटणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. सर्प विज्ञान, फसवी बुवाबाजी व जादूटोणा विरोधी कायदा याबाबत जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. मंत्राने कोणताही आजार किंवा समस्या किंवा विषारी सर्प दंश झालेल्या व्यक्तीचे विष मंत्राने उतरवून दाखविणाऱ्या मांत्रिकास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून२१लाख ₹चे बक्षीस देण्यात येईल असे याप्रसंगी जाधव यांनी सांगितले. ढोंगी लोक दाखवित असलेल्या चमत्कारासारखेच विज्ञानावरील अनेक चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करुन त्यामागील विज्ञान जाधव यांनी स्पष्ट करुन सांगितले. या शिबिराला ६० चे वर शिबिरार्थी हजर होते असे देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस ऊर्जानगर यांनी कळविले आहे.














