बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – कवी जयंत चावरे

0
58

एस.एन. मोर महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – आज माणसा माणसांमधील संवाद कमी झाला आहे. तरुण पिढी तर मोबाईल वरून फक्त बोटांनीच बोलत आहे. परंतु आज मानवी नाते जपून ओठांनी हृदयाची भाषा बोलण्याची खरी गरज आहे. असे प्रतिपादन विदर्भातील प्रसिद्ध कवी व वक्ते जयंत चावरे (यवतमाळ) यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयाचा ‘अंतरंग २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख अतिथी म्हणून जयंत चावरे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून योगेश सिंगनजुडे (माजी नगरसेवक, तुमसर नगर परिषद),देवचंद (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) हे उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. कोमलचंद साठवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल,राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संस्थेचे संचालक निखिल जैन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये जयंत चावरे यांनी आसू आणि हस’ या विनोद व भावनिक गांभीर्य यांचे मिश्रण असलेल्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थित मंडळींची मने जिंकली.

अंतरंग २०२५’ या दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बौद्धिक व सांस्कृतिक अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील क्रीडा विभागाकडून वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये कबड्डी, क्रिकेट, बॅटमिंटन, चेस इत्यादी अनेक खेळांचा समावेश होता. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे गायन, नृत्य, नाटक, मेहंदी, रांगोळी, वादविवाद, निबंध, प्रश्नमंजुषा, वेशभूषा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच विशेष उपलब्धी प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी प्राचार्य डॉ. कोमलचंद साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर झलके (उपायुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, भंडारा) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रीडा विभागाचे संचालक डॉ. संजय आगाशे तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ. राधेश्याम दिपटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी व कार्यकारी प्राचार्यांच्या हस्ते गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रेणुकादास उबाळे, डाॅ संतोष चौधरी व कनिष्ठ महाविद्यालयातील रजनी गायधने यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. कोमलचंद साठवणे यांनी केले. तसेच प्राचार्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विशेष परिश्रमाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डाॅ. अरुणा बावनकर व डॉ. राजेश दिपटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here