पुणे येथे झाडीपट्टीच्या नाटकाचा सन्मान.
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गडचिरोली – मराठी साहित्यिकांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील मातंग साहित्य परिषद या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “महापूजा ” या नाटकास नाट्यलेखनाचे सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मातंग साहित्य परिषद, पुणे चे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी निवड पत्राद्वारे कळविले असून महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिलला सकाळी ११ वा. भारतीय विचार साधनेचे सभागृह, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेचे सदस्य डॉ . विनयजी सहस्रबुद्धे यांचे शुभहस्ते तसेच मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ . धनंजय भिसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र असे आहे.
‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे . झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्यास यापूर्वी साहित्य विहार संस्था नागपूर, आधार साहित्य मंच, बोरगाव (ता. तासगाव जि.सांगली), व शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढा (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या तीन संस्थांचे लेखनाचे
प्रथम पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, रमेश निखारे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), प्रा. संतोष मेशराम, प्रा. संजय लेनगुरे, मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक), व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.

