स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – चंद्रपूर दि. 9 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल पर्यंत ‘समता सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून समितीला प्राप्त झालेल्या प्रकरणांची जलद गतीने तपासणी करून अर्जदारांना विहीत मुदतीपूर्व 8 एप्रिल रोजी CCVIS या प्रणालीतून ऑनलाईन 50 जात वैधता प्रमाणपत्र अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर निर्गमीत केलेले आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) दत्तप्रसाद नडे यांच्या नेतृत्वाखाली व उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिध्दार्थ गायकवाड, संशोधन अधिकारी आशा कवाडे यांच्या विशेष प्रयत्नाने वरील मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. तसेच समितीकडे आक्षेप पूर्ततेकरिता प्रलंबित असलेली प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेप त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दुध डेअरी रोड, चंद्रपुर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे.
ज्या अर्जदारांनी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांच्या प्रकरणात समितीने आक्षेप नोंदविलेला आहे, अशा अर्जदारांना CCVIS या प्रणालीवरुन त्यांच्या नोंदणीकृत Email ID वर आक्षेप पूर्ततेचा संदेश पाठविण्यात आलेला आहे. असा संदेश प्राप्त झालेल्या अर्जदारांनी त्यांची सर्व मुळ कागदपत्रे घेऊन समिती कार्यालयात 8 ते 14 एप्रिल रोजी उपस्थित राहावे, आक्षेपाची पूर्तता केल्यानंतर लवकरात लवकर जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेत जास्तीत जास्त अर्जदारांनी सहभागी होण्याचे आव्हान उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, यांनी केले आहे.

