
तालुका प्रतिनिधी अहेरी विवेक मिरालवार 8830554583 – अहेरी तालुका मुख्यालयपासून २० किमी अंतरावर असलेल्या मोसम जंगल परिसरात कु जलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, १२ एप्रिलला सकाळी ७ वाजता उघडकीस आली.
यासंदर्भात अहेरी पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसम येथील वनरक्षक विजू मडावी हे १२ एप्रिलला सकाळी ७वाजता कक्ष क्रमांक ६१५ मध्ये गस्त घालत असताना कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी याबाबत माहिती अहेरी पोलिसांना दिली.
अहेरी पोलिसांनी घटनेची दखल घेऊन पंचनामा केला. काळे, पांढरे केस असलेली ४५ ते ५५ वयोगटातील सदर महिला असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले करीत आहेत.














