prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0
153

प्रशांत रामटेके संपादक – डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली. सर्वसामान्य जनतेसाठी वैचारिक जागृती करून आपल्या हक्कासाठी आपण लढले पाहिजे याची जाणीव करून दिली . माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्बल घटकांसाठी मिळवून दिला. यासाठी त्यांनी रक्तविहीन क्रांती घडविलि आणि संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षापासून शोषणाच्या पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या समूहाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून दिले.हजारो वर्षापासून अंधकाराच्या गर्तेत बुडालेल्या समाजाला नवचैतन्य निर्माण करून दिले .त्या समाजाचा एका नव्या संस्कृतीत उदय झाला .असे म्हणतात की पृथ्वीला प्रकाशमान करण्याचे कार्य केवळ सूर्यच करू शकतो आणि म्हणूनच या पृथ्वीवर काही प्रमाणातील लोकांची मानवता नाकारणार्‍या समाजाला ओळख एका सूर्याने आपल्या तडफदार नेतृत्व गुणाने निर्माण करून दिली .ही एक प्रकारची रक्तविहीन समाजक्रांती होती.डॉ आंबेडकरांनी मृतपाय दुर्बल घटकांच्या देहात जणू प्राणच ओतला त्यांच्या गुदमरलेल्या श्वासाला चंदने दिली .त्यांच्या अनंत दुःखांना आपला भरभक्कम आधार दिला.दुसर्‍यांच्या ओंजळीने पाणी पिण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा असा संदेश दिला .त्यांना दयेची भीक नको होती तर हक्क हवे होते.म्हणतात ना हक्काचा कोंबडा बरा पण दयेचा मोर नको.या न्यायाने ते स्वतः जगले आणि समाजाला जगायला शिकविले.14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्धाच्या अत्त दिप भव या उक्तीला त्यांनी स्वतःच्या जीवनात आणि समाजाच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान दिले.स्वतःचा मार्ग स्वतः शोधत , स्वतःचा दीप स्वतःच व्हायला सांगितले .या त्यांच्या संदेशाला समाजाने आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान दिले.स्वतःवर होणाऱ्या जुलमाविरुध्द जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाही तोपर्यंत त्याचे दुःख त्यांची यातना कमी होऊन त्यांचा उद्धार होऊ शकत नाही.डॉ बाबासाहेब म्हणत होते , गुलामाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करेल असा संदेश त्यांनी दिला .भारताच्या इतिहासात 1950 साली जे घडले त्यात दुर्बल घटक समाजाला एक मानाचे जीवन लाभले . डॉ आंबेडकरांनी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा लोकशाही विचारांचा त्यांच्यावर झालेलया प्रभावातून आणि इतर देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची राज्यघटना लीहली . आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली. 26 जानेवारी 1950 मध्ये ती अमलात आणली आणि सर्व समाजाला एकसमान हक्क देण्यात आले आणि घटनेचे शिल्पकार म्हणून साऱ्या जगात बहुमान मिळविला. जगाला ती प्रेरक सुद्धा ठरली आहे. आपल्या समाजातील स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नती चे हक्क राज्यघटनेनेच दिले त्यात धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांना दिलेला समान हक्क आणि म्हणूनच आज स्त्री सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर दिसून येते. डॉ आंबेडकरांनी आपल्या विचारांची संजीवनी सर्व देशवासीयांच्या मनामनात ओतली आहे आपल्या कर्तुत्वाने वैचारिकतेचा मळा फुलविला. आयुष्याच्या 65 वर्षात त्यांनी विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कृषी, औद्योगिक इत्यादी क्षेत्रात असंख्य कार्य करून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिले.ते म्हणतात, ज्या जातिभेदांमुळे सामाजिक जीवनात तट पडले आहेत.आणि जातीजातीतील मत्सर आणि शत्रुत्व निर्माण झाले आहेत .या जातीभेदाचा त्याग करून भारतीयांनी सामाजिक आणि भावनिक अर्थाने एक राष्ट्र बनवावे. हा त्यांचा विचार भारतीयांसाठी प्रेरक ठरतो . याच त्यांच्या मौल्यवान विचाराचा प्रत्येक व्यक्तीने अवलंब करायला हवा. अशा या महामानवाची जयंती उत्सव 14 एप्रिल 2025 रोजी साऱ्या देशभर साजरी होत आहे .या जयंती दिनानिमित्त महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते.

लेखिका संगीता राजेश नागदिवे
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here