prabodhini news logo
Home गडचिरोली भूमिकेशी समरसून झपाटलेपणाने अभिनय करणाऱ्या कलावंत : रागिणी बीडकर

भूमिकेशी समरसून झपाटलेपणाने अभिनय करणाऱ्या कलावंत : रागिणी बीडकर

0
152

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कलेची उपासना करण्याकरिता कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करून साधना सिद्धीस नेता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ झाडीपट्टी स्त्री कलावंत , नाट्यलेखिका, गीतकार रागिणी बीडकर होय. मुळातच बालपणापासून असलेली कलेची आवड आणि त्यात नाट्यक्षेत्रात कार्यरत मातोश्री शांताबाई देवळीकर यांचे संस्कार यामुळे रागिणी बिडकर यांची जडणघडण नाट्यकलावंत म्हणून झाली. सांनगडी जि. भंडारा (सद्या तिरोडा) येथे वास्तव्यास असलेल्या रागिणी बिडकर यांचा कलाप्रवासही गमतीदारच आहे. केवळ चौथा वर्ग शिकलेल्या रागिणी यांनी पुढे झाडीपट्टीमध्ये अभिनयाबरोबरच नाट्य लेखनातही चुणूक दाखवीत विलक्षण ओळख निर्माण केली. प्रामुख्याने झाडीपट्टीतील पहिली स्त्री नाटककार म्हणूनही त्यांचा गौरवाने उल्लेख करता येईल.

रागिणी बीडकर यांचा झाडीपट्टी रंगभूमीवर १९८६ पासून रंगमंचीय प्रवास झाडीपट्टीची नाट्य पंढरी वडसा येथील महाराष्ट्र ललित रंगभूमीच्या माध्यमातून सुरू झाला. संगीत हा झाडीपट्टी रंगभूमीचा आत्मा असल्यामुळे लावणी नृत्यास प्रेक्षकांची विशेष पसंती होती. त्यामुळे ‘बिजली कडाडली’ या नाटकातील लावणी नर्तिकेच्या पदार्पणाने झाडीपट्टी रंगभूमीवर धडाकेबाज एन्ट्री केली. ‘काळजाला काळीज ढसलय ग ‘,’रक्तात रंगला गाव’ अशा विविध नाटकातून लावणी नृत्याचे बहारदार सादरीकरणाने चाहता प्रेक्षक वर्ग निर्माण झाला.
महाराष्ट्र ललित रंगभूमी, धनंजय रंगभूमी, आणि झाडीपट्टी रंगभूमी या विविध प्रेसमध्ये रागिणी बीडकर यांनी स्त्री कलावंत म्हणून लावणी नृत्यांगना,चरित्र अभिनेत्री तर काही नाटकांमध्ये विनोदी भूमिकाही साकारल्या आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक ,कौटुंबिक नाटकातून रागीणी बीडकर यांनी विविध परीच्या भूमिका उत्तमरित्या वटविल्या आहेत.’एक नार तीन बेजार’ मधील हिरा, कलंकित देवदासी’ कोटीवाली , कुंकू माझं सौभाग्य तुझं’ मधील केशर व अंजू, ,’बायको का मातून गेली? ‘जानकी,माझं घर माझी माणसं’ सरस्वती, सुनबाई जरा जपून’ मधील ममता, संसार माझा पाखराचा ‘ राधिका,’लग्ना आधी पुसले कुंकू’ हीं सवत माझी लाडकी ,भिकारी -भोग नशिबाचे. बंधन तुटले प्रेमाचे. सून लाडकी या घरची’ बलिदान, होळी पेटली जीवनाची’, रखेलीचा पुत्र’, आई तुझा आधार हवा , साडे आठशे पेक्षाही अधिक प्रयोग झालेल्या वासू दोडके यांच्या ‘पुत्र भारत मातेचा,’ संजय ठवरे यांच्या ‘बायको लायक नवरा नालायक’ नाटकातील अर्पिता यासारख्या नाटकातून भूमिकेशी समरस होणे केलेल्या कसदार अभिनयाने त्या प्रेक्षकप्रिय ठरल्या.

नृत्यकलेत निपुण ,धडपडी वृत्ती, नाविन्याचा ध्यास,भारदस्त संवादफेक,गोड गळा, नैसर्गिक अभिनय, भूमिकेशी समरसून अभिनय करण्याची झपाटलेपणाचीवृत्ती या विशेषषामुळे रागिणी बीडकर यांचा रंगमंचीय प्रवास बहरतच गेला. गुरुस्थानी असणाऱ्या आई शांताबाई देवळीकर यांचे संस्कार व नाटककार पती प्रदीप बीडकर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अस्वस्थ करणाऱ्या विषयामुळे नाट्य लेखनाच्या उर्मीतून लेखनही केले आहे. सन १९९७ मध्ये जिवलग मैत्रिणी , हुंड्यासाठी मोडणारे लग्न, भर लग्नात ठोकर देणारा नवरदेव, गरीब मुलीची दयनीय स्थिती या विषयावरील त्यांचे’ कुंकू माझं सौभाग्य तुझं’ हे त्यांनी लिहिलेले नाटकही प्रचंड गाजले. पुत्र होत नसल्याच्या कथानकावर आधारित दोन बहिणींच्या विलक्षण नात्याचे दर्शन घडविणारे ‘सवत माझी लाडकी ‘ हे सन १९९९ मधील नाटक व त्यानंतर ‘नसून पती सौभाग्यवती ‘बदलत्या नात्याचे दर्शन घडविणाऱ्या नाटकाचे लेखनही रागिणी बिडकर यांनी केले आहे.
रागिणी बिडकर या संवेदनशील वृत्तीच्या असल्यामुळे झाडीपट्टी नाटकात त्यांनी गीत लेखनही केली आहे.
‘ स्वत माझी लाडकी ‘,या नाटकातील” सजना तुझ्याच साठी हे गीत आले ओठी, दे हात माझे हाती तोडू नको रे प्रीती’, ‘दृष्ट न लागो ग बाई माझ्या या सुखाला सुखी ठेव रे देवा माझ्या या परिवाराला’ रताळलेल्या पायी मी घुंगरू आता बांधले लाज विसरूनिया मी हो तुमच्यापुढे नाचले’, कोमल हृदयावर माझ्या ठेवलास तू निखारा गाठले पहिले तीर तू शोधू कुठे रे किनारा”,”धरलास का रे मजसी असा अबोला, सांग असा का माझा घडला गुन्हा” यासारखे गीत लेखनही रागिनी बिडकर यांनी केली आहे, कसदार कलावंत, उत्कृष्ट नृत्यांगना, नाट्यलेखिका,उत्तम गायिका, गीतकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूमुळे झाडीपट्टी प्रचंड लोकप्रिय ठरल्या.झाडीपट्टी रंगभूमीच्या जवळ जवळ तीन हजारपेक्षाही अधिक नाटकातून विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. नाटकात प्रामुख्याने डॉ. परशुराम खुणे,माणिक शिंदे, देवेंद्र दोडके, कमलाकर बोरकर, उमेश जवळे,शेखर डोंगरे. मधु जोशी,राजेश चिटणीस, शेखर पटले.,देवेंद्र लुटे.,नरेश गडेकर,यशवंत चोपडे या दिग्गज सहकलावंतांसोबत त्यांना अभिनयाची संधी मिळाल्यामुळे धन्यता वाटते. आरमोरी जवळील डोंगरगाव येथील ‘माझं घर माझी माणसं’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी पहिल्या अंकानंतर ८५ वर्षीय नाट्यरसिक विंगेत येऊन सहकलावंत देवेंद्र दोडके आणि रागिनी बिडकर यांच्या अभिनयाने चरण स्पर्श केल्याचा अनुभव त्यांना सर्वात मोठा पुरस्कार वाटतो. चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलनात व सांस्कृतिक संचालनायाच्यावतीने मुल येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात रागिणी बीडकर यांचा सन्मान करण्यात आला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने त्यांना जाहीर करण्यात आलेला झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .त्यांच्या कर्तुत्वाला सलाम.स्त्रियांसाठी अनेक बंधन असण्याच्या काळातही निष्ठेने नाट्यसेवा करणाऱ्या या स्त्री कलावंतास प्रणाम.

प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here