आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर
वाघमारे कुटुंबांने मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर- दि. १३ – राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांसाठी १२ एप्रिल २०२५ हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्यांची मुलगी आराध्या मंगेश वाघमारे हिची कॉक्लियर इम्प्लांट ही अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला नसता तर आम्हाला आज हा आनंद अनुभवता आला नसता, या शब्दांत वाघमारे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत.
आराध्या अवघी १ वर्षांची असताना दोन्ही कानांना पूर्णतः बहिरेपणा असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वाघमारे कुटुंब चिंतेत होते. प्राथमिक उपचारांमध्ये काहीच यश न मिळाल्यानंतर त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष दिले. सागर खडसे यांना वाघमारे कुटुंबाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
आ. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी योग्य मदत व पाठबळ दिल्यामुळे टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ. श्वेता लोहिया यांच्या मार्गदर्शनात आराध्याचे ऑपरेशन पार पडले. आज आराध्या ऐकू शकते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू या यशोगाथेची साक्ष देतात. वाघमारे कुटुंबाने सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.
मंगेश वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आ. मुनगंटीवार यांना देवदूत म्हटले आहे. ‘आमच्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले आहेत. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आरोग्य सेवेत मानवी दृष्टीकोन व संवेदनशील नेतृत्व किती महत्त्वाचे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करणार आहो,’ अश्या भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केल्या.

