
शारदा भुयार जिल्हा प्रतिंनिधी वाशिम – कारंजा लाड : मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचे 18 रोजी कारंजा येथील सावरकर चौक येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली बाईक रॅली ही सिंधी कॅम्प, डॉ. बाबासाहेब चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चंद्र बोस चौक, जाणता राजा चौक, जिवाजी महाले चौक प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करून बाबासाहेब धाबेकर सभागृह येथे येऊन सभा घेण्यात आली.
ही जिजाऊ रथयात्रा 18 मार्च पासून शहाजी महाराज जयंती दिवशी भोसले गढी, वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून सुरू झाली आणि 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी लाल महाल, पुणे येथे समाप्त होईल.
संविधान, कायदा आणि अधिकारांची जाणीव नागरिकांना व्हावी, हा या यात्रेचा उद्देश आहे. सर्व धर्म, जाती-पंथ एकत्र करणारे, सामाजिक एकात्मता व अखंडतेचे महत्त्व, समाजात सद्भावना व एकात्मता राखण्याचे महत्त्व, जातीय तेढ, सामाजिक फूट यावर जागृती आणणारे विचार मांडून एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. कृषी व अर्थव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन, रोजगार व शिक्षण याविषयी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, शासकीय योजना व फायदे व विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती यावर चर्चा करण्यात येत आहे.
कारंजा लाड येथून जिजाऊ रथयात्रा वाशिमच्या दिशेने मार्गस्थ होत झाली. शहरातील नागरिकांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














