उद्धरावे तुला तूची l
आत्मनाश करू नये l
तुझा तूचि खरा मित्र l
तुझा शत्रू ही तूच रे ल
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भगवान श्री कृष्णानी दिलेला गितेच्या माध्यमातून अर्जुनाला दिलेला बोध केवळ त्याच्यापुरता मर्यादित नसून अखिल मानव जातीला दिलेला संदेश आहे. माणसाच्या हाती कोठे जन्मला यावे हे नाही. कोण आई वडील हे निवडता येत नाही. कोणत्या धर्मात जातीत ऐवढेच नव्हे तर कोणत्या परिस्थितीत काळात जन्म घ्यावा. हे स्वातंत्र्य नाही.हे अगदी खरे आहे. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्या हातात नाहीत. येथे आपल्याला आहे तसे हवे ते कधीच मिळत नाही. याबाबतीत आपल्याला नशीब प्रारब्ध यांच्यावर अवलंबुन राहावे लागते.
अगदी श्रीराम देखील भरताला समजून सांगतात “खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा “
अशा अनेक बाबतीत पराधीन असणारा माणूस आपले जीवन कसे सार्थक करणार?
त्याला अनेक गोष्टी स्वतःच्या उद्धार करण्यापासून रोखल्या जाणे अगदी स्वभाविक आहे. तो अगदी सर्वस्वी पराधीन आहे. नियतीचे खेळणे आहे. कठपुतळी प्रमाणे केवळ सूत्रधाराच्या साहाय्याने त्याच्या ईशाऱ्यावर नाचायच हेच त्याचे नशीब काय?
ही सर्व वर वर खरी वाटणारी विधाने नकारात्मक बाजू समर्थपणे सांगतात. त्यात तथ्य जरी असले तरी शंभर टक्के नाही.
काळ्या कुट्ट अंधारात
जेव्हा काही दिसत नसत. तिथंच दिवा घेऊन कोणीतरी उभ असते. प्रकाशात उडायच की अंधारात कुढायच?
सांगा कस जगायचं?
असे कवी मंगेश पाडगावकर विचारतात
त्यातूनच प्रयत्नरूपी आशेचा किरण लक्ख
उजळतो. माणसाच्या हाती प्रयत्न हे फार मोठे साधन मिळाले आहे. त्या आधाराने तो
अशक्य ते शक्य करीता
सायास कारण अभ्यास तुका म्हणे l
तसेच संत रामदास यांचा प्रयत्नवाद दैव वादावार मात करतो.
ते म्हणतात यत्नाचा लोक भाग्याचा l यत्नेवीण दारिद्रता l
प्रयत्नांना यश हमखास मिळतेच पण योग्य दिशा, निर्णय,ध्येय निश्चिती मार्गदर्शन, कठोर परिश्रम या योगे
प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यशाची किल्ली हाती आल्या शिवाय रहात नाही. अशा वेळी नशीब, दैव या गोष्टींना हार मानावी लागते. म्हणून सर्व संत, एकमुखाने प्रयत्न श्रेष्ठ मानतात. कारण प्रत्यक्ष न दिसणाऱ्या निराकार परमेशाला ते प्रसन्न करून घेतात. एवढच नव्हे तर ते नराचा नारायण होऊ शकतो अशी ग्वाही देतात.
देह देवाच्या कारणी लागता देव होतो ऋणी
हे सामर्थ्य निश्चित पणे प्रयत्नच करतात. अशी असंख्य उदाहरणे आहेत कोणत्याही प्रकारची सुविधा अनकुलता नसताना केवळ पराक्रम, चातुर्य, बुद्धिमत्ता, योग्य वेळी योग्य निर्णय, समयसूचकता, धैर्य, साहस, निर्भयता, चिकाटी अशा अनेक गुणांनी आपल्या जीवनाचे सुंदर शिल्प घडवता येते. अनेकांनी ते घडवले. आपले जीवन सार्थक केले. कुणी कला, विद्या, शास्त्र अध्यात्म, सेवा, भक्ती, प्रेम अशा अनेक क्षेत्रात आपल्या प्रयत्ननांनी स्वतःला समर्पित करून आपले जीवन पुष्प ठरवलेल्या ध्येया साठी समर्पित केले.
इतरांना प्रेरित कार्याने अचंबित केले. ते सर्वांचे
प्रेरक दिपस्तंभ झाले. त्यांची नावे उदाहरणे देणे केवळ अशक्य आहे. इतिहास त्यांची नोंद सुवर्ण अक्षरात कोरून ठेवतो. प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
या दीपस्तंभांच्या प्रकाशात आपले जीवन शिल्प साकार करावे. त्यांची जीवन चरित्रे अभ्यासावीत त्यांच्या जीवनातील चढ उतार बारकाईने अभ्यासावेत. त्या वरून आपला जीवन मार्ग निश्चित करावा. अथक योग्य परिश्रम करून आजन्म कार्य करावे. आपल्या जीवन पुष्पाचा सुगंध सदैव दरवळत ठेवावा. प्रभूपदी अर्पण करावा.
लेखिका सौ. उर्मिला आपटे
सातारा

