प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – लोकजागृती संस्था चंद्रपूर प्रस्तुत,ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपूरे लिखित, निर्माता अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित,संगीत “गोंडवानाचा महायोद्धा: क्रांतिवीर बाबुराव शेडमाके ” नाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर येथील विभागीय 100 व्या नाट्य संमेलनात सादर झाले..
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पूर्व विदर्भही मागे नव्हता. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा थोर आदिवासी क्रांतिकारक सुपुत्राची गाथा असलेले ऐतिहासिक चरित्र नाट्य वीर बाबुराव शेडमाके यांची शौर्यगाथा स्पष्ट करणारे. या नाटकातून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके , बोलमपल्लीच्या पराक्रमी कुंवर राणी यांच्यातील विवाहाचा प्रसंग ,लढाईचा प्रसंग चकित करणारा आहे.अन्याय अत्याचारी प्रवृत्तीच्या इंग्रजां विरुद्ध लढा देण्यासाठी आदिवासी बांधवांना एकत्र करून जंगोम सेनेची स्थापना केली. छोट्या छोट्या राजांना सोबत बोलावले. राजे राजेश्वर राव, राजे वेंकटराव यासोबतीने मेठासिंग बाबा यांच्यासारख्या क्रांतीज्योतच्या शिलेदारांमुळे इंग्रजा विरुद्ध लढा दिला.
कॅप्टन किस्टन यांच्या नेतृत्वातील ब्रिटिश सैन्यांना सळो की पळो करून सोडले. फंद फितुरीने कॅप्टन क्रिस्टलने राणी लक्ष्मीबाईला नजर कैदेत ठेवत मोठा इनाम घोषित करून चतुराईने वीर बाबुरावांना पकडले .बाबुरावांना फाशी देण्यात आली परंतु ते त्यामुळे मरत नव्हते ; तेव्हा कॅप्टन क्रिस्टलने ताडवावीर बाबुरावांनाच मृत्यूचे रहस्य विचारले असता बांबूच्या देठाच्या दोरीने फाशी देण्याविषयी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांनी सांगितल्यामुळेच त्यात त्यांचा मृत्यू झाला. एकंदरीत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन संघर्ष नाट्यप्रयोगातून संक्षिप्त स्वरूपात उलगडला आहे. गोंडवन राज्य स्वतंत्र झालं पाहिजे यासाठी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ब्रिटिशांसारख्या बलाढ्य शत्रूशी लढत प्राणत्याग करणाऱ्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या राजाच्या शौर्यगाथेचे हे नाटक आहे. गुलामगिरी व अत्याचार नष्ट करण्यासाठी देहत्याग करणाऱ्या शूरवीरांची ही गाथा आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत स्वभाषा, स्वधर्म आणि स्वतंत्रतेचा जागर करणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाची ही वीरगाथा आहे. ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या क्रांतीयोद्धाची ही संघर्षगाथा ,सत्ता संघर्षाची व मुक्ती लढ्याची शौर्यगाथा म्हणजेच नाटक.
झाडीपट्टीतील बाबुराव शेडमाके ‘हे नाटक नाट्यशास्त्राचे जाण असलेल्या प्रयोगशील रंगकर्मी अनिरुद्ध वनकर यांनी दिग्दर्शन करताना अत्यंत अनोख्या पद्धतीने सिद्ध केल्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आवडले.मुळात झाडीपट्टीच्या कमर्शिअल फॉरमॅटमधील सातपुरुष आणि चार महिला या ठराविक साच्याच्या ऐवजी या नाटकात जवळपास १८ ते २० कलावंतांचा रंगमंचावर होते . ‘गोंडवानाचा महायोद्धा:क्रांतिवीर बाबुराव शेडमाके’ या शौर्यनाट्यात सुरुवातीला छऊया ओडीसातील लोकनृत्य प्रकाराचा वापर समर्पकरित्या करीत नाट्याशय दर्शविलेला आहे. तद्वतच लढाईच्या दृश्यामध्ये अत्यंत हुशारीने दिग्दर्शकीय कसब वापरून जास्तीत जास्त व्हिज्युअली ,सुंदर आणि प्रभावी रीतीने केलेल्या मांडणीने चलचित्राप्रमाणे दृश्य साकारत प्रेक्षक अचंबित होतो. कमीत कमी संवाद, ऐतिहासिक चरित्र साकारण्याकरिता जास्तीत जास्त दृश्यांची केलेली मांडणी, कलावंतांच्या अभिनयासाठी विशेष स्पेस, प्रभावी सादरीकरण, प्रसंगनुरूप नृत्य व गीते या विशेषमुळे शंभराव्या मराठी नाट्य संमेलनात वीर बाबुराव शेडमाके या नाट्यप्रयोगाने वेगळीच रंगत आणली. पारंपारिक ठराविक ढाच्याचे झाडीपट्टीतील नाटक पाहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना आगळावेगळा प्रयोग पाहता आला.म्हणून हे झाडीपट्टीतील प्रायोगिक (एक्सपिरिमेंटल) नाटक झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासातील प्रायोगिक दृष्ट्या कक्षा विस्तारणारा मैलांचा दगड असेही म्हणता येईल.
कल्पक, प्रयोगशील दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी सॉंग अँड ड्रामा पद्धतीचा अवलंब करीत जंगल, झाडे – झुडपे पक्षी,बगीचा ,फळे, फुले नदी, झाडे, हत्ती ,प्राणी,दर्शविले आहेत. शिवाय आदिवासींचे पारंपारिक पोशाखातील बहारदार रेलॉ नृत्यामुळे प्रयोगात चांगलीच रंगत आली. ऐतिहासिक चरित्रनाट्य हे प्रभावी सादरीकरणामुळे अप्रतिम झाले. या नाटकातील भूमिका आणि कलावंत : बाबुराव – स्नेहल वाडगुरे ,राणी कुंवर – प्रियंका सिडाम,राणी लक्ष्मीबाई – रुपाली खोब्रागडे,.व्येकटराव – राजरत्न पेटकर, क्रिक्टन – अमित दुर्गे, रामजी गेडाम – संजीव रामटेके,मेटासिंग – अंकुश शेडमाके,रमण व शिपाई – मयूर मस्के,दीक्षित – शुभम गुरनुले,वझिरअली:-अविनाश कडुकार,विस्तारी- यश शेंडे ,पोच्या/शिपाई – अनुराग मुळे, वैभव मगरेतथा मनिष लेडांगे, प्रविना लाडवे, संजना येळेकर, सपना मेश्राम, प्रतीक्षा उईके या सहकारी कलावंतांच्या सकस अभिनयाने व ऑर्गन धम्मा मेश्राम, ऑक्टोपॅड विक्की राऊत,तबला सोनू घोडम यांच्या संगीत साथीमुळे प्रयोग उत्तम झाला. नृत्य, नाट्य आणि प्रायोगिकतेमुळे बदल घडविणाऱ्या नाटकामुळे नाट्यसंमेलनातील रसिक प्रेक्षक अभिनवतेने सादर झालेल्या नाट्यप्रयोगाचा मनमुराद आस्वाद घेत राहिला.
लेखक प्रा. राजकुमार मुसणे

