चंद्रपूर, दि. 5 मे : सन 2025 पासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-2 अंतर्गत 21 जिल्ह्यांमधील एकूण 6959 गावांमध्ये विविध कृषि विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. टप्पा-1 प्रमाणेच या टप्यातही हवामानास अनुकूल पीक वाणांचे बीजोत्पादन, जमिनीच्या सुपीकतेसाठी उपाययोजना, फळबाग व बांबू लागवड, तसेच जिवाणू खतांची निर्मिती यांसारख्या घटकांचा समावेश असणार आहे. यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होण्यास निश्चित मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर महाबीज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी टप्पा-2 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. या करारामुळे 21 जिल्ह्यांतील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्त्रोत बियाणे किंमत आणि बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच महाबीजमार्फत उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचा संघ महाजैविक या उत्पादनांचा शेतकरी बंधू व भगिनींना 100 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.
प्रकल्पातील समाविष्ट् जिल्ह्यांमध्ये गळीतधान्ये व पौष्टिक तृणधान्ये लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिनीकीट्स उपलब्ध करून दिले जातील. तसेच जैविक बुरशीनाशक व खते तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक (Master Trainers) यांना महाबीजमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुका बीज गुणन केंद्रांवर (TSF) बीजोत्पादन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्त्रोत बियाणे दर व बीज प्रमाणीकरण शुल्क परतावा दिला जाईल. प्रकल्प गावांमध्ये चारा पिकांचे बियाणे तयार करण्यासाठी बीजोत्पादनास प्रोत्साहन दिले जाईल.
या उपक्रमाच्या अनुषंगाने परिमल सिंह यांनी अकोला येथील महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळा, बीज प्रक्रिया केंद्र आणि मुख्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. या प्रसंगी पोकराचे मृदाविज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर व महाबीजचे सर्व विभाग प्रमुखही उपस्थित होते.

