भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय कार्यक्रमाचे आयोजन..
सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – भारतीय सैन्य हे केवळ रणांगणावर लढणारे शूर योद्धे नाहीत, तर प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. त्यांचे शौर्य, त्यांची निःस्वार्थ सेवा आणि मातृभूमीबद्दलची निष्ठा हीच खरी देशभक्ती आहे. १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा सैन्याचा आत्मविश्वास वाढवतो. आज आपण पक्ष, धर्म, भाषा, जात विसरून एकत्र आलो आहोत, हेच भारतीयत्वाचे खरे दर्शन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर वंदन भारतीय सैन्याच्या शौर्याला या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत भारतीय सैन्याला सामूहिक वंदन केले. यावेळी आमदार जोरगेवार बोलत होते.
कार्यक्रमास मनीष महराज, पास्टर बिपीन, जामा मस्जिद चे मौलाना इमाम दिलशाद रजा, माजी सैनिक अश्विन दूर्गे, रोषण अलोणे, ओबीसी नेते अशोकराव जीवतोडे, कॉंगेसचे माजी नगर सेवक नंदुजी नागरकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष बंडूजी हजारे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझले, तुषार सोम, प्रकाश देवतळे, सुभाष कसान कासनगोट्टूवार, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या चारुशीला बारसागडे, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर, नामदेव डाहुले, बंटी घाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे दादाजी नंदनवार मिलिंदजी गंपावार, भाजपचे माजी नगर सेवक राहुल घोटेकर, पंडित मथुराप्रसाद पांडे, नळे, माजी सैनिक राजेंद्र भोयर, माजी सैनिक गोविंदा डोमकावळे, माजी सैनिक धोंडुबा सपाट, माजी सैनिक मदन देशकर, माजी सैनिक अरुण मालेकर, मधुसूदन रुंगठा, संजय बोरघाटे, वाणी राव, अनिल समर्थ आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, आज आपण केवळ एक भावना, एक श्रद्धा आणि एक अभिमानाने भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणारे, कठीण हवामानातही ताठ मानेने उभे असलेले, प्रत्येक संकटात देशवासीयांचा जीव मोलाचा मानणारे भारतीय जवान आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. भारतीय सेना ही केवळ एक लष्करी शक्ती नाही, ती आपली अस्मिता आहे, आपली सुरक्षा आहे आणि आपले अभिमानाचे प्रतीक आहे.
आजच्या कार्यक्रमात सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय लोक एकत्र आले आहेत. हाच खरा भारत आहे. विविधतेत एकता आणि राष्ट्रप्रेम हाच आपल्या संस्कृतीचा पाया असून, हाच देशाचा गौरव आहे. देशासाठी लढणारा जवान जात, धर्म, पक्ष, प्रांत याच्या पलीकडे जातो. त्याला फक्त भारत माता दिसते. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळेच आपण शहरात आणि गावात सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कार्याला अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे, सैन्याने केवळ सीमारेषा सुरक्षित ठेवल्या नाहीत, तर आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यांच्या योगदानाची आठवण फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झाली तर ती पुरेशी नाही. ही कृतज्ञता आपल्याला दररोज जगायला हवी. असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध धर्मीय आणि सर्व पक्षीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अमजद खान यांनी आभार प्रदर्शन केले तर प्रज्ञा जीवनकर यांनीसूत्र संचलन केले.

