100 व्या नाट्य संमेलनात
दुधराम कावळे यांची जोरदार फटाकेबाजी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने विभागीय शंभराव्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित नाट्य संमेलनात झाडीपट्टीचे रसिक प्रिया विनोदवीर दुधराम कावळे यांच्या संपतच्या लग्नाने उपस्थित नाट्यर्शिकांना हसवत अचंबित केले. धनंजय स्मृति रंगभूमी वडसा प्रस्तुत नितीन नाकाडे निर्मित चंदू भाऊ नैताम लिखित तूच माझी सौभाग्यवती’ या नाटकातील विनोदी प्रसंग नाट्यसंमेलनात बहारदारपणे सादर केला.
लग्न अनेक होतात परंतु संपतच्या मुलीचे लग्न मात्र काही विशेषच होते. एखाद्या मंत्र्यांचा मोठा भव्य कार्यक्रम सोहळाअसावा तसा संपतच्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा . अर्थातच पाहणाऱ्यांनाही व ऐकणाऱ्यांनाही अचंबित करणारा. जेवण करणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे असे पदार्थ. लग्नातल्या भाजीची तीन वर्ष हाताची चव जात नव्हती, पंधरा दिवस सतत भांडे घासतच होते याचा अर्थ भांडे स्वयंपाकाकरता किती वापरले असतील ?. चाळीस बोरे मीठ स्वयंपाका करता वापरलेले होते. याचा अर्थ किती वऱ्हाडी जेवली असतील ? मिरची भजे किती केले असतील त्याकरिता पाच ट्रक मिरच्या वापरल्या. छत्री एवढाले पापड आणि विटा एवढाले पाथोडी, लंब्याचवळ्या चवळीच्या शेंगा, नूडल्स सारखे जेवणारे चुरपत जेवत होते, याचा अर्थ जेवण लग्नातील किती स्वादिष्ट रुचकर असेल,लग्न किती भव्य दिव्य असेल याची कल्पना येते. लग्नात वाजवलेली वाजंत्री जिचा आवाज पाच-सहा किलोमीटर सहज पोहोचणारा होता त्या वाजंत्री चा आजही नाव घेतलं तरीही लोकांच्या मनात धून तयार होते एवढी जबरदस्त वाजंत्री होते. संपत यांनी आपल्या मुलीच्या लग्नात जावयाकरिता खास दोन पांढऱ्या रंगाचे घोडे बोलावलेले होते. लग्नातील पदार्थ एकापेक्षा एक सरस, श्रेष्ठ आणि भव्य असल्याने व महामेळाव्यासारख्या या संपतच्या मुलीच्या लग्नाने पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण भागात आगळाच विक्रम तयार केलेला.
एकूणच संपतचे कार्य अचाट स्वरूपाचेच. संपतला गावातील नाटकात महाभारतातील दुर्योधन, रामायणातील रावण, महाप्रतापी कुंभकर्ण या भूमिका दिल्या खऱ्या पण संपतच्या भयंकर आणि विलक्षण भूमिकेमुळे ते नाटकच कॅन्सल झाले. संपत मुळे नाटक कॅन्सल होते म्हणून संपतला नाटकाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय नाट्य मंडळाने घेतला आणि झाशीची राणी हे नाटक गावात बोलविले. झाशीची राणी घोड्यावर बसून स्टेजवर आली संपत बिडीचा चटका घोड्याला देताक्षणी घोडा उधळत बाहेर पळाला आणि तेही नाटक कॅन्सल झाले .याचा अर्थ संपत नाटकात राहो की नाही नाटक मात्र कॅन्सलच होणार ,असा विघ्नप्रतापी संपत यांचे व्यक्तिमत्व विलक्षण आहे. अति बडाया मारणाऱ्या संपत सासऱ्याचा अवास्तव फुगलेला फुगा तेवढ्यात चातुर्याने फोडणारा इरसाल जावई किरपाल सयाम यांनी जबरदस्त साकारला.
साध्या सुपारीचा खांड न खाणाऱ्या जावयाकडे मात्र संपतची मुलगी पान ठेल्यावर जाऊन खऱ्याची उदारी करते. खर्रा खाणाऱ्या बायकोमुळे वैतागलेला नवरा किरपाल सयाम यांनी उत्तम वटविला. पातीचा बैल कापणारा बाप, पाहुणा म्हणून आलेला साला दारू पिऊन न जेवता झोपणारा त्याला दिवसभर वाकळ धुवायला लावणारा संपत तथा कवचपुरीचा प्रयोग अशा वेगवेगळ्या चमत्कृतीपूर्ण संवादाने नाट्यगृहात हशा पिकतो. टीरिंग टिरिंग सारख्या अभ्यस्त शब्दाच्या उच्चारनानेही हास्यस्पदता निर्माण होते.
अवास्तवतेने ओतप्रोत भरलेल्या अचाट कल्पनाशक्तीच्या जोरावरील विनोदी प्रसंगाच्या नाट्यप्रयोगाने नाट्य रसिक अवाक् झाला. चेहऱ्यावरील सोज्वळ भाव, आकर्षक शरीरयष्टी , बोलकी देहबोली, भारदस्त आवाज, स्पष्ट उच्चार, परफेक्ट संवादफेक, व जबरदस्त पंचमुळे विनोदवल्ली (झाडीपट्टीचा भाऊ कदम) दुधराम कावळे यांनी नाट्य रसिकांना खुश केले.
खोटं बोला पण रेटून बोलणाऱ्या संपत अर्थात दुधराम कावळे यांच्या विलक्षण आविर्भावाने, हजरजबाबी किरपाल सयाम व नयना खोब्रागडे या त्रिवेणी जुगलबंदीने प्रेक्षागृहातील नाट्यरसिक पोट धरून हसले.
प्रा. राजकुमार मुसणे

