प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पाचपावली, नागपूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने(MSBSHSE) 13 मे 2025 रोजी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात पाचपावलीतील एस.सी.एस. गर्ल्स हायस्कूल ने 100% निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे.
शाळेतून विशाखा प्रमोद कोहाड हिने 91℅ गुणांसह प्रथम तर तनुश्री राजेश खापेकर 87℅ गुणांसह द्वितीय व तेजल पंकज शेंडे 84℅ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त केले आहे. उत्तर नागपुरात मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणात अग्रस्थानी असणारी ही शाळा असून या शाळेत निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनी अतिशय कष्टाने, संघर्षशील परिस्थितीत अध्ययन करीत असतात. 1922 ला स्थापन झालेल्या या संस्था व शाळेला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळेतून 30 विद्यार्थिनींनी दहावीची बोर्डाची परीक्षा दिली होती. त्या सर्व विद्यार्थिनींनी पास होऊन 100% यशाची परंपरा निर्माण केली आहे. त्यापैकी 21 विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. या विद्यार्थिनींना कोणत्याही शिकवणी वर्गाचा आधार नव्हता तर शाळेतील अध्यापनावरच त्यांनी हे कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
एस.सी.एस.गर्ल्सच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संत चोखामेळा समाज मुलींच्या शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत डोंगरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संदीप डोंगरे, संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल गजभिये यांनी व शाळेच्या प्राचार्या सुहासिनी टेकाडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी वीणा नकाते, पर्यवेक्षिका अपर्णा बहिले, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
एस. सी.एस.गर्ल्सच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

