तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – पाचपावली, नागपूर दिनांक 11 मे 2025- एस. सी.एस. गर्ल्स कला , वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पाचपावली, नागपूर येथे ‘दहावीनंतर पुढे काय?’ या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दहावीनंतर शाखा निवड व करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य डॉ. अशोक गव्हाणकर यांनी कला व वाणिज्य या शाखांतील तर करिअर मार्गदर्शक वक्ते माजी प्राचार्य डॉ. नरेंद्र भुसारी यांनी विज्ञान शाखेतील भवितव्य घडविणाऱ्या पर्यायांबाबत उपस्थितांना सखोल माहिती दिली. दोन्ही प्रेरणादायी वक्त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र व आपली क्षमता ओळखून त्याप्रमाणे कला, वाणिज्य व विज्ञान यापैकी कोणती शाखा निवडावी यासाठी अनेक उदाहरणे देऊन डिजिटल सादरीकरण प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन करत भविष्यातील शिक्षणाच्या वाटा विषद केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.सी.एस गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. संदीप डोंगरे यांनी भूषविले. संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल गजभिये यांनी एस.सी.एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय आगामी शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडविणाऱ्या अनेक उपक्रमास कसे प्राधान्य देणार आहे यावर अतिशय उद्बोधक व भावस्पर्शी असे वक्तव्य केले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष विजय शेंडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुहासिनी टेकाडे ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्रा. वीणा नकाते, पर्यवेक्षिका अपर्णा बहिले ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता धारगावे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
एस.सी.एस. गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव कार्यक्रमास जवळपास 300 विद्यार्थी व पालकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. शालिनी तेलरांधे यांनी तर व्याख्यात्यांचा परिचय प्रा.डॉक्टर सत्यजित सूर्यवंशी यांनी करून दिला. प्राचार्या सुहासिनी टेकाडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. एस .सी .एस .गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

