प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – प्रल्हाद नाट्य रंगभूमी प्रस्तुत संगीतकार प्रल्हाद मेश्राम निर्मित, सिने.नरेश गडेकर दिग्दर्शित, धनंजय ढवळे लिखित ‘अत्याचार ‘नाटकातील प्रवेश अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने नागपूर येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित शंभरव्या नाट्य संमेलनात यशस्वीरित्या सादर करण्यात आला. मंजन विकणारा रत्नदीप, मिमिक्री करणारा निशांत या दोघांची मुलीला आपलेसे करण्याकरिता अर्थात पटविण्याकरता चाललेली कसरत, त्याकरिता त्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या युक्त्या, तिला इम्प्रेस करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे हा विनोदी प्रवेश होय.
आता घेता का? कोणी सांगा बरं ,दहा रुपयात देतो खरं, असे म्हणणारा दुखमंजन कंपनीचा अजब विक्रेता, प्रसंगनिष्ठतेच्या स्थानिक संदर्भ देत चातुर्याने केलेल्या त्यांच्या डायलॉगबाजीने, हास्योत्पादक शब्दांच्या विविध पंचने प्रेक्षक हसले .हास्याचे फवारे उडविणारा विनोदवीर (रत्नदीप रंगारी ),विविध लोकप्रिय अभिनेत्याच्या हुबेहूब मिमिक्रीने प्रेक्षकांना रिझवणारा आणि विविधरंगी छटाने हसविणारा कॉमेडीयन (पोपटलाल) निशांत अजबेले, नृत्यांगना सुगंधा (प्रणाली राऊत) या तिघांनी सादरीकरणाचा चांगला प्रयत्न केला.तिघांची जुगलबंदी, कल्पकता व दमदार प्रस्तुतीमुळे नाट्याशय समर्थपणे दर्शविण्यात कलावंत यशस्वी ठरले.
‘एक फुल दो माळी ‘चा प्रत्यय देणारा हा प्रवेश विलक्षण ठरला. सन्नान देखणी बाई, मजाचा खर्रा खाणारी, दहा नवरे विकत घेऊ शकतो पण मजाचा खर्रा सोडणार नाही अशी खर्राबाज सुगंधा, दोघातील गुटरगु च्या संगीताच्या चालीवरील एकमेकाकडे विलक्षण पाहणे, जवळीकता , प्रेमाभिलाषा , आतुरता, मंजन विक्रेता व बांगड्या विक्रेता दोघेही तिच्याशी लग्न करण्यासाठी घेत असलेला पुढाकार यामुळे झालेल्या विनोदनिर्मितीने प्रेक्षकांनी आनंद घेतला.पारंपारिक विनोदाचा बाज टाळत दंतमंजन विक्रेत्याच्या विनोदाने रत्नदीप रंगारी व सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून बांगड्या विकणारा निशांत अजबेले यांच्यातील खटकेबाज संवादाने प्रयोगात चांगलीच मजा आणली .
आता घेता का मंजन ,दहा रुपयात देतो खरा,सातबारा कोरा, नमुना आठ ,डांबरतोंड्या, मस- हाल्या, जांगडगुत्ता, घुबरा फुटला ,बाई – एक हजार धानाची लाही, चायना मॉडेल अ आ इ, देवा माझ्या, देवा बिन नवऱ्याला मारीन खरा खरा , रंगीबेरंगी बांगड्या ,दुधी भट इंडिया घासू , लटाऱ्या, टेट्रा ,फुसनाड्या , चोंगल
मिट्टू, पाडाचा आंबा मस्त लागते, मार्बल, पाच फुटाचे गड्डे, चूरपून, पिल्लारी कोंबडी , लचांड, पाहुणे- मेहुणे अशा हास्यौत्पादक शब्दोच्चाराने हास्याचे फवारे उडवत मजेशीर रंगत आणली.’ नवरे म्हणजे लोकांच्या मांडवावरचे दुधी भोपळे हो का,’देवा माझ्या देवा तू नेट पॅक मारना,आणि माझ्यासाठी बायको तू डाउनलोड मारणा,… मी माझ्या बहिणीला राखीला नेतो आणि पोरा करून वापस घेऊन येतो..’ ‘ घराचा टाकायचा कुठली तर टाकून द्याचा’अशा बांगडी विक्रेत्याच्या द्विअर्थी संवादाने पेक्षागृहात हशा पिकला.’राखी आहे तर बहिणीला राखीला नेतो आणि कानोबा पोळा झाला किंवा वापस आणून देतो’ अशा केलेल्या स्पष्टीकरणामुळे प्रेक्षक हसत राहिला.
‘ ब्रशान आणलो मंजनान आणलो, आता घेता का कुणी सांगा बरं ,दहा रुपयात देतो खरं, बुरबार केलेला, चिचे बाभळीचा पाला हा ,याचा भुरका बनवला मी दात घासायला, असा वाटून आणलो कुटून आणलो घेता का.,’दुख मंजन घ्या ना ‘या विनोदी गीत गाऊन रत्नदीपने प्रेक्षकांना चांगलेचखुशकेले.निशांत अजबेलेने मकरंद अनासपुरे, जॉनी लिव्हर , नाना पाटेकर,प्रभाकर पणशीकर या दिग्गज अभिनेत्याबरोबरच मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मिमिक्रीने धमाल केली.
सर्वसामान्य अशिक्षित सेल्समनला लग्नासाठी मुली ठेवण्यासाठी प्रचंड मनस्ताप व खटाटोप करावा लागतो, वेगवेगळे सोंग घ्यावे लागते, विद्यमान काळात लग्नकरिता मुली मिळवणे कठीण असल्याने मुलच्या शोधात भटकणाऱ्यांची व्यथा या प्रवेशातून दर्शविली. तसेच सरकारचे कार्य हे ‘बहिणीला जेवण कराले बोलवाने आणि भाटोला ताटावरून उठवणे’ लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये बहिणीला देणे आणि तेलपिपा हजार रुपयांनी वाढवणे असे असल्याचे विनोदी ढंगाने केलेले विद्यमान स्थितीवरील भाष्य अंतर्मुख करणारे ठरले. सतत विविध शाळाबाह्य कामाचा ताण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची व्यथाही दर्शविली.
रत्नदीप रंगारी यांच्या अस्सल झाडीबोलीतील गमतीदार संवादाने , निशांतच्या हरहुन्नरी अभिनयाने व प्रणालीच्या दिलखेचक अदाकारीने ,विनोदाच्या टाइमिंगने, गमतीदार संवादाने प्रेक्षक खळखळून हसले.
प्रा. राजकुमार मुसणे

