उत्तर महाराष्ट्रातून एकमेव गौरव
नितीन पाटील
विशेष तालुका प्रतिनिधी, अमळनेर
मो. 8758428853
अमळनेर : भारतीय संसदेतील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करणाऱ्या ‘संसद रत्न पुरस्कार 2025’ ची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, यावर्षी महाराष्ट्रातील सात खासदारांचा सन्मान घोषित झाला आहे. या यादीत उत्तर महाराष्ट्रातून केवळ एकमेव आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांची निवड होणे, हा जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे
संसद रत्न पुरस्कार हा भारतीय लोकशाहीतील सर्वोत्तम संसदीय कार्यगौरव मानला जातो. लोकसभेतील प्रश्न विचारणे, चर्चेत सक्रीय सहभाग, खासगी विधेयक मांडणे, लोकहिताच्या विषयांवर सतत आवाज उठवणे आदी अनेक निकषांवर आधारित निवड प्रक्रीयेव्दारे हा पुरस्कार दिला जातो.
या पुरस्काराची संकल्पना ‘गांधी विचार मंच’ व राजकीय विश्लेषक टी.एस. कृष्णमूर्ती (माजी मुख्य निवडणूक आयुक्त) यांच्या पुढाकाराने 2010 मध्ये साकारली गेली असून प्राइम पॉइंट फाउंडेशन (Prime Point Foundation) या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पहिल्यांदा संसद रत्न पुरस्कार 2010 साली प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या प्रेरणेतून या पुरस्काराला दर्जा व महत्त्व प्राप्त झाले खा. स्मिता वाघ यांनी 17 व्या लोकसभेपासून संसदेतील प्रत्येक अधिवेशनात आपली ठसठशीत उपस्थिती नोंदवली आहे. संपूर्ण देशातील रेल्वे अंडरपास बोगदे कसे चुकीचे आणि नागरिकांना वाहतुकीला त्रासदायक व खर्चिक ठरत आहेत हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासोबत शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, बेरोजगारी, शिक्षण धोरणे अशा विविध विषयांवर त्यांनी प्रभावीपणे प्रश्न मांडले आहेत त्यांच्या अभ्यासपूर्ण, प्रामाणिक आणि जनहितकारी भूमिकेमुळेच त्यांना ‘संसद रत्न’ सारखा राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून स्मिता वाघ यांचा हा सन्मान त्यांच्या अल्पावधीतच प्रभावी कामगिरीचे प्रतीक आहे.
अशी आहे खा वाघ यांची कामगिरी
खासदार वाघ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०० टक्के हजेरी लावली असून एकंदरीत हजेरी ९६ टक्के आहे. त्यांनी २६ चर्चासत्रात सहभाग घेतला असून एकूण १३० प्रश्न विचारले आहेत.
या गौरवाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, युवा वर्ग आणि विविध पक्षीय पदाधिकारी तसेच समाजातील विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण लोकसभेत त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे हा सन्मान केवळ खासदार वाघांना नव्हे, तर जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला मिळालेली पावती आहे.

