अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 103 स्थानकांचा लोकार्पण समारंभ
चंद्रपूर, दि. 21 मे : भारत सरकारने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत 22 मे 2025 रोजी देशभरातील 103 स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवाडी, डोंगरगड, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, चांदाफोर्ट व आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा इतिहास व विकास:
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानक गोंदिया–नागभीड–बल्हारशाह या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर स्थित आहे. या स्थानकाची स्थापना इ.स. 1908 मध्ये झाली असून, 1999 मध्ये ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व 2018 मध्ये विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. हे स्थानक कृषिप्रधान भागात असून, प्रवाशांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत चांदाफोर्ट स्थानकाचा 19.3 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश स्थानकाचा कायापालट करून ते आधुनिक, प्रवासी अनुकूल व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केंद्रात रूपांतरित करणे आहे.
करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा व सुविधा:
पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण-उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – चांदाफोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत, ‘खुर्दा पॅटर्न’नुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट व एस्केलेटर (दुसऱ्या टप्प्यात) – सुलभ प्रवासासाठी, कोळसा उद्योग व गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, 12 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन इत्यादी.
स्थानकांची वैशिष्ट्ये :
या स्थानकाच्या नव्या रचनेत चांदाफोर्ट किल्ल्याच्या स्थापत्यशैलीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये झरोखे, बुर्ज, बलुआ दगडाची रंगसंगती व पारंपरिक सजावट यांचा समावेश असून, स्थानिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे उत्कृष्ट मिश्रण येथे पाहायला मिळते.
नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती दिली की, चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा हा कायापालट स्थानिक इतिहास, वारसा व आधुनिक सुविधा यांची सांगड घालणारा आहे. हा विकास केवळ रेल्वे विभागासाठी नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व परिसरातील नागरिक व पर्यटकांसाठीही अभिमानाची बाब ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या स्थानकाचे लोकार्पण होईल, तेव्हा चांदाफोर्ट रेल्वे स्थानक हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे व तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणून उभे राहील.

