प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे यंत्रणांना निर्देश
चंद्रपूर, दि. 20 मे : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे. आजची युवा पिढी या सेवनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी अंमली पदार्थाच्या सेवनमुळे मानवी जीवनावर होणा-या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती करा. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतुक, साठवणूक आणि विक्री प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को – कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिक्षक विजयकुमार, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, प्रदीप मडावी आदी उपस्थित होते.
शाळा – महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ, दारु, तंबाखुचे सेवन होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत शिक्षण विभागाने मॅरेथॉन रॅली, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्य व इतर माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस विभागाच्या सहकार्याने शाळा – महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित कराव्या. यासाठी वर्षभराचे योग्य नियेाजन करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानक भेटी देऊन प्रतिबंधित ड्रग्ज विक्री होत आहे की कसे, याची तपासणी करावी.
जिल्ह्यात तसेच आंतरराज्य सीमेवरील शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याबाबत शेतक-यांना अवगत करावे. सोबतच ग्रामस्तरावरील कृषी अधिका-यांकडून पाहणी करण्यात यावी. टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आला तर तात्काळ पोलिसांना कळवावे. खाजगी वाहनाद्वारे येणारी टपाल, पार्सल, कुरीअर अकस्मितपणे तपासावे. एमआयडीसी परिसरात किती कारखाने आहेत, तेथे प्रतिबंधित उत्पादन होते काय, तसेच बंद असलेल्या कारखान्यांची संयुक्तरित्या तपासणी करावी, आदी सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

