विद्युत विभागाने एरियल बंच्ड केबल टाकण्याचे काम सुरू केले.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या समतानगर येथे रात्रीच्या वेळेस विजेचा व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने समतानगर येथील शेकडो नागरिकांनी मागील अनेक वर्षापासून होत असलेल्या विजेच्या त्रासाअभावी विद्युत वितरण विभागाला अनेक पत्रे दिली. दिनांक १९/०४/२०२५ ला देखील मा. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना पत्र दिले होते. परंतु यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत होते.
समता नगर वार्ड क्र. १ (नेरी) उर्जानगर येथे गेल्या अनेक वर्षापासून सिंगल फेज असल्यामुळे उन्हाळ्यात विजेची जास्त मागणी असल्याने अपेक्षित विज पुरवठा होत नव्हता व त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात नागरीकांना गर्मीचा फार त्रास सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सतीश भडके यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात भेट देत समस्या मांडली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी समतानगर वार्ड वासियांना सोबत घेत मा. मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, चंद्रपूर यांची भेट घेत सदर समस्या निदर्शनास आणून दिली. तसेच विजेचा व्होल्टेज कमी-जास्त होवू नये याकरिता या भागात तात्काळ थ्री फेज कनेक्शन जोडणे संदर्भात विनंती केली. तेव्हा समतानगर वार्डातील नागरिकांची गैरसोय लक्ष्यात घेऊन मा. मुख्य अभियंता यांनी मा. उप कार्यकारी अभियंता यांना तात्काळ केबल उपलब्ध करून जोडण्याची सूचना केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाणे तिसऱ्या दिवशीच महावितरण विभागाने काम सुरू केल्याने समतानगर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले.
वार्डवासियांच्या विनंती वरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शेजुळ, सतीश भडके, रोशन फुलझेले, कुलदीप सिंह बावरे, आशिष ठक्कर यांनी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

