prabodhini news logo
Home चंद्रपूर आणीबाणी देशाच्या संविधानावरील सर्वात मोठा प्रहार – प्रा. अतुल देशकर.

आणीबाणी देशाच्या संविधानावरील सर्वात मोठा प्रहार – प्रा. अतुल देशकर.

0
101

स्वतःच्या कुटुंबातच देशाची सत्ता राहण्यासाठी आणीबाणी लादल्या गेली – विवेक सरपटवार

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीतील संघर्ष नायकांचा सत्कार.

ब्रह्मपुरी प्रतींनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरी २५ जून २०२५ : ५० वर्षांपूर्वी २५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वतीने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी मधे राष्ट्रवादी विचारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सरकारच्या वतीने अटक करण्यात आली होती. भारतीय लोकशाही मधील २५ जून १९७५ हा काळा दिवस होता. या वर्षी आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाले. या आणीबाणी मधे ब्रह्मपुरीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रवादी विचाराने काम करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती या सर्व संघर्ष नायकांचा भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी च्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून भद्रावती येथील विवेक सरपटवार उपस्थित होते.
ब्रह्मपुरी मधील संघर्ष नायक वामन भुसारी, यशवंत नानोटी, दिलीप शिनखेडे यांना सन्मान चिन्ह देऊन माजी आमदार प्रा. देशकर यांनी सन्मानित केले. आज हयात नसलेले संघर्ष नायक स्व. नानासाहेब जोशी, स्व. बाबुराव लांबे, स्व. गणपत दलाल, भास्करराव भुसारी, स्व. वामनराव लांबे, स्व. नामदेवराव सालोटकर यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला. या प्रसंगी वामन भुसारी, यशवंत नानोटी, दिलीप शिनखेडे यांनी कारागृहात आलेल्या अनुभवाचे कथन केले तर स्व. नामदेवराव सालोटकर यांचे चिरंजीव प्रा. डॉ. अशोक सालोटकर यांनी वडील कारागृहात असताना परिवाराच्या परिस्थितीचे कथन केले.

आणीबाणी जाहीर करणे हा देशाच्या संविधानावरील सर्वात मोठा प्रहार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले. तर विवेक सरपटवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वतःच्या कुटुंबातच देशाची सत्ता राहवी या अट्टाहासामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी देशावर लादण्यात आली असल्याचे सांगितले. देशातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारने आणीबाणी मधील संघर्ष नायकांच्या त्यागाचा, संघर्षाचा सन्मान केला आहे असे नमूद केले.
या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने संघर्ष नायकांच्या परिवारातील श्रीपाद जोशी, संजय लांबे, प्रकाश दलाल, गोविंद लांबे यांच्या सह भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव साकेत भानरकर यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ब्रह्मपुरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here