
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी,
हृदयी अमृत नयनी पाणी.
अथांग असते अबला जीवन,
तुझ्याहूनही खोल समुद्रा.
समुद्र आणि स्त्री यांच्यात मला नेहमी बरेच साम्य वाटते. दोघांचे मन अथांग विशाल आणि विस्तीर्ण आहे. दोघेही त्यांच्या सहवासात येणार्याला गुण-दोषासह व चांगले-वाईट विचारसह पूर्णपणे स्वीकारतात. दोघेही वर वर शांत दिसत असले तरी त्यांच्या अंतरंगात काय सुरू आहे याची कल्पना कोणी करू शकत नाही. समुद्राच्या फेसाळणाऱ्या एका मागून एक येणार्या लाटा हळू हळू रौद्ररूप धारण करतात. सहाजिकच तेव्हा कोणी मनुष्य त्याच्या जवळ जात नाही. दुष्टांचा संहार करणार्या आदिमाया अंबाबाई, जगदंबा, महिषासुरमर्दिनी स्त्री च्या या रूपाची महती आपण सारे जाणतोच.
‘स्त्री’ परमेश्वरानं निर्माण केलेली अप्रतिम आणि सुंदर कलाकृती. नाजूक असली तरी वेळ प्रसंगी कणखर, जिद्दी असते. आई, पत्नी, बहीण,मुलगी,मैत्रीण सगळ्या नात्यांच्या भूमिका जबाबदारीने आणि समर्थपणे पेलत असते. पूर्वीच्या काळी पुरुषप्रधान संस्कृतीत चूल आणि मूल याखेरीज कोणतंच स्थान नव्हतं. आज स्त्रियांनी सर्व संकटावर जिद्दीने मात करून कित्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महिला आज राष्ट्रपती, डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षिका, अंतराळवीर, कलेक्टर, पायलट झाल्या आहेत.
ही एक जमेची बाजू आहे.
स्त्री जननी आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असे म्हटले जाते. दुसरीकडे आपण खूप विचार करण्यासारखे आहे. आपण स्त्री मुक्ती भाषणे, जागतिक महिला दिन साजरा करतो. आजही कित्येक विवाहिता सुशिक्षित असूनही त्यांना घरात कसलच स्थान नसतं, तिचा काही ना काही कारणावरून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जातो, तिचा कोंडमारा होतो. मनात विचार येतो की आज स्त्री सुरक्षित आहे का??
लेखिका:-
सौ. अंजली जोशी
चिंचवड














