
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
पूर्व वैदर्भीय झाडीपट्टी रंगभूमीवर ज्यांनी पंचेचाळीस वर्ष अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विलक्षण छाप निर्माण करीत
अधिराज्य गाजविणारे नटसम्राट, म्हणजेच गणपती रामदास वडपल्लीवार होय.हे नटवर्य आपचे नाट्य गुरु यांनी माझ्यासारख्या असंख्य कलावंतांना घडविले. नाट्य लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध भूमिका लीलया पेलत रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन करीत झाडीपट्टी रंगभूमीला प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्येष्ठ नटवर्य वडपल्लीवार गुरुजी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

९ मार्च १९४३ रोजी सरांचा जन्म झाला. जन्मापासूनच त्यांना नाटकांची आवड होती १९६० मध्ये त्यांनी राम गणेश गडकरी लिखित राज संन्यास या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेपासून जोमदार सुरुवात केली. वयाच्या सेवेंटीन पासून केलेली सुरुवात नॉनस्टॉप सेवेंटी पर्यंत चालली तरीही सेवेंटीन चा संभाजी आणि सिवेंटी चा संभाजी मध्ये तीच जरब आणि तोच जोश होता. सरांनी १९६३मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद येथे शिक्षक सेवा सुरू केली तेव्हा एका बाजूला शिक्षकी आणि दुसऱ्या बाजूला रंगभूमीची सेवा तसेच सुरू ठेवली. एकाच वेळी दोन्ही सेवेत कार्यात उत्कृष्ट कामगिरी म्हणावी लागेल कारण की सरांना महाराष्ट्र सरकारने १९९१ ला महाराष्ट्रातील आदर्श शिक्षक म्हणून गौरविले तर त्यानंतर याच महाराष्ट्र सरकारने पुन्हा महाराष्ट्रातील उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून गौरव केला. आज पर्यंत सरांनी पाचशेहून अधिक विविध नाटकात पाच हजारहून अधिक नाट्य प्रयोग केल्याचा इतिहास त्यांच्या नावी झाडीपट्टीने नाट्यरंभभूमीने कोरला आहे.
वडपल्लीवार सरांचे गुरुवर्य स्वर्गवासी आदरणीय गोविंदराव मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाने व बंधुतुल्य मुरलीधर ईरलवार यांच्या साथीने सन १९६४ मध्ये आरमोरी येथे हौशी रंगमंदिर ची स्थापना करून खऱ्या अर्थाने झाडीपट्टीत नाट्य कलेचे बीज रोवले आणि ह्या या बिजातून आज गडचिरोली जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्यभूमी चे फक्त वृक्ष नाही तर अरण्य तयार झाले आहे. या नाट्य साम्राज्य अरण्यास आज महाराष्ट्रातील कुठलीच नाट्यरंगभूमी टक्कर देऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या नाट्यरंभभूमीच्या विकासाचे श्रेय सरांना जातात. यात त्यांचा फक्त वाटा नसून सिंहाचा वाटा आहे.
हौशी रंगमंदिर आरमोरी द्वारे अनेक दर्जेदार नाटक त्यांनी सादर केली. सरांची आवडती भूमिका जरी संभाजी आणि कर्ण असला तरी त्यांना परिसरात एक क्रूर खलनायक म्हणून विशेष ओळखल्या जायचं . फक्त नाट्यकलाकार म्हणूनच सर थांबले नाहीत तर शेकडो नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी पार पाडले. त्यांच्या मार्गदर्शनातून आज या झाडीपट्टी रंगभूमी वर शेकडो कलावंत तयार झाले आणि आज प्रसिद्ध नाट्यकलाकार म्हणून त्यांनी सुद्धा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. .आवर्जून सांगायची झाल्यास सिने कलावंत प्रेमा किरण सरांना अन्नदाता म्हणून म्हणायच्या.

बहुचर्चित मरीमाईचा भुत्या या नाटकात पाचशेहून अधिक प्रयोगात मंगू माडिया ची अतिशय क्रूर भूमिका त्यांच्या नाट्य इतिहासातील प्रमुख अभिनय. अनेक पौराणिक नाटकात कंस मामा, रावण, दुर्योधन, भीम इत्यादी… तर ऐतिहासिक नाटकात अफजलखान व औरंगजेबाच्या सलतणीतील अनेक खानांच्या भूमिका व सामाजिक नाटकात खलनायक मालगुजर, पाटील, सरपंच, भ्रष्ट नेता इत्यादी नाट्य अभिनयाचा विशेष उल्लेख मी करेन. यासोबतच सरांच्या गाजलेल्या भूमिका म्हणजे तंट्या भिल्ल नाटकातील तंट्या, दौल्या उमाजी नाईक, काडोजी, ययाती, देवव्रत, कर्ण, अलिबाहद्दर, धर्माप्पा शेठ, शेखर, वीर बाबुराव शेडमाके, सुधाकर, पद्माकर, अशी अनेक अष्टपैलू नाट्यकलाकृतींनी सरांनी साठ वर्षाहून अधिक रंगदेवतेची सेवा केली.

वर्तमान झाडीपट्टी रंगभूमीवरील प्रेक्षकांची गर्दी खेचणारी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा. शेखर डोंगरे, अरविंद झाडे, हिरालाल पेंटर, अमर मसराम, डॉ.सदानंद बोरकर, नरेश गडेकर, आसावरी तिडके, शबाना खान, के. आत्माराम, शेखर पटले इत्यादी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
विकासी आणि क्रांतिकारी विचार असल्यामुळे त्यांना नाट्य क्षेत्रातच वेळ देणे स्वस्त बसू देत नव्हते. शिक्षकांना कमी पगार असल्यामुळे, स्वतःच्या आणि परिवाराच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे हे लक्षात घेऊन, शिक्षण आणि शिक्षक विकास व आंदोलनाची सुरुवात केली. सहकारतून स्वतःच्या घरीच शिक्षक सोसायटी ची सुरुवात केली. शिक्षक सोसायटीचे सलग पंधराहून अधिक वर्ष अध्यक्ष पद सांभाळले. सन १९७८ साली
राज्यव्यापी शिक्षक संप आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे अठरा दिवसाचा तुरुंगवाद सुद्धा भोगाव लागला. सत्याग्रह यशस्वीतीनंतर शंभरीचा पगार हजारावर गेला. शिक्षक नेता, सहकार नेता आणि नाट्यकलावंत म्हणून काम करत असताना काही विरोधकांच्या कुटनितीमुळे दक्षिण गडचिरोली भागाततील आदिवासी क्षेत्रात बदली करउन घेतली. तिथेही त्यांनी वेळेचे सोने केले. सरांना अभ्यासाची वाचनाची लेखनाची फार सवय होती. शालेय वेळेनंतर नाटक आणि इतर बाबी कमी असल्यामुळे भरपूर वेळ भेटायचा म्हणून साहित्य लेखनास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेले पहिले नाटक माता मायेचा मुंजा हे महाराष्ट्र शासनाचे वांग्मय साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाले. या नाटकास आठव्या झाडीबोली साहित्य परिषदेच्या संमेलनात २७ जानेवारी २००१ ला उत्कृष्ट नाट्य लेखक म्हणून पुरस्कार प्राप्त झाले. नाट्य लेखन, निबंध लेखन, शोधनिबंध लेखन करिता पेन त्या काळात अत्यंत जोराने धावत होती.
त्याची सुद्धा शासनाने दखल घेतली आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शोधनिबंधास लेखनाचे सरांना तीन वेळा राज्यस्तरीय तर पाच वेळा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल. त्याच काळात सेंसर नाटके न्याय उलटा नियतीचा, नामर्द, झाडपी माणसं याचे लेखन कार्य पूर्ण झाले. या व्यतिरिक्त चार नाटक अप्रकाशित आहेत तर काही साहित्य, काळाने अर्धवट ठेवले.अशा बहुआयामी शिक्षकास, नाट्य लेखक, नाट्य कलाकार, नाट्य दिग्दर्शककास राष्ट्रीय स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत तब्बल एकतीस वेळा विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. अनेक नाट्य संमेलन, साहित्य संमेलनाचे सरांनी अध्यक्ष स्थान भूषविले आहेत तर शेकडो कार्यशाळेत मार्गदर्शक समीक्षक म्हणून कार्य केलेले आहेत.

यापुढे जाऊन सामाजिक चळवळी त्यांनी उभ्या केल्या ज्यामध्ये आरमोरी येथील शालेय बांधकाम, सांस्कृतिक रंगमंच बांधकाम, इंदिरा आवास योजनेसाठी नाट्यप्रयोग, सामाजिक समस्या निर्मूलन कार्यक्रम, नसबंदी उपक्रम, आदिवासी शिक्षण आरोग्य आणि शेती व्यवसायातून वित्तीय विकास इत्यादी अनेक पोस्ट विकासात्मक कार्याकरिता आपल्या वेळ दिला त्याकरिता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग द्वारे सन २०१२ ला आदिवासी गिरीजन पुरस्कार व रुपये एक लक्ष धनराशी देऊन मुंबई येथे सहपत्नी सन्मान करण्यात आला.
माझ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील पन्नास वर्षाच्या वाटचालीत सर्वात जास्त सहवास मला आदरणीय स्वर्गवासी गणपतराव वडपलीवर गुरुजींचा लाभला, १९७५ पासून आतापर्यंत मी बऱ्याच नाटकात काम करून अभिनयाचे धडे घेतले, त्यांच्या तालमीत मला खूप काही शिकता आले, म्हणून मी त्यांना माझे नाट्य गुरु मानतो. त्यांच्या आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर सदर असायचा, मी त्यांचा सगळ्यात लाडका शिष्य होतो याचा मला अभिमान आहे. आत्तापर्यंत मला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेत आत्ताच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्यात माझ्या स्वर्गवासी वडपल्लीवार गुरुजींचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्याच प्रेरणेने मला माझ्या जीवनाची वाटचाल करता आली. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मी त्यांची शेवटची भेट घेतली आणि त्याच दिवशी सरचा जीवन प्रवास थांबला. अश्या बहुआयामी, बहुगुणी, अष्टपैलू नेतृत्वाचे, कर्तुत्वाचे धनी श्रद्धेय स्व. ग. रा.वडपल्लीवार यांच्या त्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन भावपूर्ण
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे















