
मनातलं प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा इतर सजीवासाठी स्वतःमध्ये असलेल्या प्रेमाची, काळजीची, आणि भावनिक जोडणीची ही एक खोल, प्रामाणिक आणि बिनशर्त भावना दर्शविते. प्रेम हे फक्त रोमँटिक प्रेमाबद्दल नाही त्यात अनेक गोष्टीचा समावेश होतो.
रोमँटिक प्रेम
या प्रेमात भागीदारामधील प्रेम आणि भावनिक जवळीक समाविष्ट आहे. जेव्हा एखाद्याच्या मनात दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रेम असते, याचा अर्थ असा होतो की त्याचे हे प्रेम वरवरचे नसते, एक खोल भावनिक हृदयातून असते. हे असे प्रेम एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल वाटणारी एक मजबूत आणि तीव्र भावनिक जोड असते. ही एक अशी भावना असते जी बहुतेकदा आकर्षण, जवळीक आणि कायमस्वरूपी नातेसंबंधाच्या इच्छेशी संबंधित असते. रोमँटिक प्रेमात एकमेकांसोबत दीर्घकाळ राहण्याची आणि एकमेकांच्या आयुष्यात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असते. उदा. प्रियकर आणि प्रेयशीमधील प्रेम, पती पत्नी मधील प्रेम.
कुटुंबाचे प्रेम
कुटुंबाचे प्रेम म्हणजे कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले बिनशर्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी, हे प्रेम कुटुंबातील सदस्यांना एकमेकांना साथ देण्यास, मदत करण्यास आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्यास प्रेरित करते.
मित्र प्रेम
मित्र म्हणजे अशी व्यक्ती जिला आपण आपलेसे मानतो, ज्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्याच्यासोबत आपण आपले सुखदुःख वाटून घेतो. मित्र म्हणजे एक खास नातं, ज्यामध्ये प्रेम, विश्वास, आणि समजूतदारपणा असतो. मित्र आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात आणि आपल्या जीवनात आनंद भरतात. हे अशा प्रकारचे प्रेम आहे जे अडचणी आणि कठिण परिस्थितीत आपल्या पाठीशी उभे राहण्यास भाग पाडते.
आध्यात्मिक प्रेम
आध्यात्मिक प्रेम म्हणजे स्वतःच्या मनाचा शोध घेणे. मनाचा विकास करणे होय, यामध्ये भौतिक जगापलिकडे जाऊन आपल्या अस्तित्वाचा अर्थ आणि उद्देश शोधणे आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी आणि इतरांशी खोलवर नाते जोडणे आहे. यात सर्व सजीवाशी मैत्रीभावाना केली जाते ते शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम म्हणून पाहिले जाते.
निर्व्याज प्रेम, जिव्हाळा, काळजी, कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय, खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार याची काहीच शाश्वती नाही, सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही, जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात. जीव ओतून आपल्याला घडवतात. वेळप्रसंगी आपल्या भल्यासाठी रागावतात पण परत माया करतात. त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये. कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही, त्यासाठी समजूतदारपणा अंगी यायला हवा.
जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत. तक्रारी मात्र सुरूच असणार. दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना बोचरी आहे. आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही. मिळेल ते अनुभव, मिळेल ती उपेक्षा, मिळेल ते प्रेम, आदर, मिळेल ती अनुभूती घ्यावी. प्रवाहात मुक्त जगावं. जीवनात सगळेच रंग हवेत. निराशेतही आशा असते. त्यासाठी संयम हवा.
कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच हे खरं आहे. पण तो आनंद मात्र आपल्या माणसांशिवाय घेता येत नाही कौतुक करणारं, पाठीवर हात ठेवणारं कुणीतरी हवंच. आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी, आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं अवतीभवती हवीतच. नाहीतर यश, पैसा खूप मिळवला पण प्रेम करणारी माणसंच नसतील तर त्याला दरिद्री म्हणावे लागेल.
जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकर प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट, हिर रांझा, लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं तेही कायमच. यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं.
शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात गेले, पण त्यांच मनातलं प्रेम भारतातील करोडो बांधवावर होत. धर्म आणि रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून बहुजन समाज वंचित होता. कुत्र्यापेक्षाही लाचार हीनदिन जीवन जगत होता. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे, असे बाबासाहेब म्हणत. रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला खूप साथ दिली. त्यांनी अनेक अडचणीवर मात करत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यास मदत केली. त्यांच प्रेम निस्वार्थ होते. आजही त्यांच्या प्रेम आणि त्यागाच्या कथा लोकांच्या मनात जीवंत आहेत. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण पाहता प्रेमाकडे भारतात फक्त आसक्ती, आणि काही मिळवण्याची आशा म्हणून पाहिलं गेल नाही तर प्रेम हे आध्यात्म आहे, प्रेम म्हणजे शांतता आहे, प्रेम म्हणजे त्याग आहे, दोन जणांपुरत प्रेम राहील आणि त्यातच विरून जाईल त्यांच्यासोबत प्रेम संपेल, हे प्रेम कधीच भारतीयांना पटल नाही. भारतातल्या प्रेमकथांकडे प्रेमासारखं पाहिलंच गेलं नाही. जगाला प्रेम शिकवलं हे भारतानेच.
प्रेम म्हणजे कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. कितीही मस्ती केली व रात्री उशीर झाला तरी आई बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी आजोबा म्हणजे प्रेम. कितीही वाद झाले तरी जेवलास का? अशी विचारणारी बहिण म्हणजे प्रेम. पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीच भेटवस्तू देणारा भाऊ म्हणजे प्रेम. सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम. कुणाचा उत्तर येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम.
एक दिवस सकाळी बुद्ध एका झाडाखाली बसले होते एक माणूस रागाने लाल होऊन तिथे आला आणि बुद्धाच्या अंगावर थुंकला. बुद्धाने कपड्याने अंगावरची थुंकी पुसली आणि त्याला शांतपणे म्हणाले, ‘मित्रा आणखी काही म्हणायच आहे का तुला’? त्या माणसाने नक्कीच विचार केला असेल, कारण तो शत्रु म्हणून आता होता. आणि ज्याचा शत्रु म्हणून आला तोच त्याला मित्र म्हणेल हे त्याने स्वप्नातही बघितलं नसेल. तो नुसता थुंकला होता. काही बोलला नव्हता. तरी बुद्ध त्याला विचारत होते, ‘आणखी काय म्हणायचंय आहे का तुला’? बुध्द त्याच्या थुंकीचा अर्थ समजले होते. कुणाचं मन प्रेमान ओतप्रोत भरून आलं म्हणजे शब्द अपुरे पडतात. म्हणून तो आलिंगन देतो. बुद्ध त्याची अडचण समजले होते. भावना ओसंडून व्हायला लागली की शब्द थिटे पडतात. म्हणूनच बुद्धाने त्याला विचारलं, ‘आणखी काही म्हणायच का तुला’? तो माणूस काही बोलला नाही. तो परत गेला. पराजित होऊन गेला. कारण जे शत्रु बनून एखाद्या ठिकाणी जातात ते एकाच परिस्थितीत हारतात. जिथे ते शत्रु बनुन गेले तिथे शत्रु आढळलाच नाही. तो हार खाऊन परत गेला. त्याला रात्रभर झोप लागली नाही. बुद्धाच म्हणणं त्याच्या मनाला सारखं पोखरत होत. त्याला झोप येणं शक्यच नव्हतं. सकाळी उजाडताच तो घावत त्या जागी आला. पण बुद्ध त्या गावावरून निघून गेले होते. जीवन कधी एका जागी थांबत नसते. ते वाहत राहतं. त्या दिवशी बुद्ध दुसऱ्याच झाडाखाली होते. तो माणूस त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, ‘क्षमा करा, माझ्याकडून मोठाच अपराध घडला.’ भगवान बुद्ध म्हणाले, ‘झालं गेलं गंगेला मिळालं. गंगेतलं कितीतरी पाणी वाहून गेलं आणि तू तिथेच थांबला आहेस’? जिथे तू थुंकला होतास तो वृक्ष कुठे आहे ? त्या घटनेचे साक्षीदार कुठे आहेत? कुठली गोष्ट उकरून काढतोस ? झालं ते झालं. मी पुढे गेलो. पण तू अजून तिथेच आहे थांबला आहेस. पण थांबू कसा शकशील ? कालप्रवाह बघ किती वाहून गेलाय !”
तो माणूस बुद्धाकडे ‘क्षमा’ मागायला आला होता. म्हणाला, ‘मला असं टाळू नका. ‘क्षमा केली’ असं म्हणा’! ‘बुद्ध म्हणाले, ‘तू काल थुंकलास आणि मी आज कशी क्षमा करू’? केवढं अंतर निर्माण झालंय त्यामध्ये तुला मी त्याचक्षणी क्षमा केली. मी क्षमा करू शकलो नसतो तर तो क्षण गेलाच नसता. तुझ्यासारखा मीही त्यात गुरफटून राहिलो असतो. तो विषय तिथेच संपला.
भगवान बुद्ध हे दुसऱ्याच्या मनातलं ओळखत होते. कधी कधी माणूस फार असमर्थ असतो, अशा काही घटना घडतात, मनात असे भाव भरून येतात की ते व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत. म्हणून बुद्धाने त्याला दोष दिला नाही. परंतु तो तिथे थांबला होता, हा मात्र त्याचा दोष होता, भगवान बुद्धामध्ये प्रेम, करुणा, त्याहीपलीकडे मैत्री होती. बुद्धाच प्रेम हे वाहतं होत.
सर्वसाधारण माणसाच प्रेम बंधनात असत. बंधनाच्या प्रेमात करुणा नसते. रस्त्याच्या कडेला उमललेल्या फुलाचा सुगंध एकासाठी नसतो. प्रेम असं वाहत असत. प्रेम हे विधायक आहे, प्रेमाची परिभाषा दुसऱ्यांना सुखी करणे आहे. कारण दुसऱ्यांना प्रेम दिल्याने माणूस आपोआप सुखी होतो. जसे ढग पाण्याने भरतात आणि पाऊस पडतो, तेव्हा फुलं उमलतात आणि सगळीकडे सुगंधाचा वर्षाव होतो, दिवा जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा सगळीकडे प्रकाश पसरवतो, तसेच आपल्या मनातलं प्रेम आहे. आपलं मन जेव्हा प्रेमाने भरुन जातं तेव्हा प्रेमाचा वाटप सुरू होतो. तेव्हा आपल्यावर कोणी प्रेम करावं याची गरजच पडत नाही. आपणच दुसऱ्याला प्रेम देतो.
डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















