
आली श्रावण पौर्णिमा
मन आनंदून गेले
रक्षाबंधनाच्या दिनी
घरी चांदणे पडले।।
भावा बहिणीचे नाते
खरोखर आहे श्रेष्ठ
त्यांच्या दोघांच्या नात्याला
लागू नये कधी दृष्ट।।
एकाच्या आईच्या पोटी
जन्म दोघेही घेतात
एकच भाकरी अर्धी
दोघे मिळून खातात।।
भावा बहिणीचे नाते
सर्व जगात निर्मळ
जसे फुलते सूंदर
चिखलामध्ये कमळ।।
रक्षण करतो भाऊ
खरोखर बहीणीचे
कोटी कोटीच आभार
मानावे लागते त्याचे।।
सुख दुःखात सोबत
नेहमी भाऊ रहातो
ईश्वर त्याच्या प्रेमाला
पहा सलाम करतो।।
भाऊ मला ग लाभला
जसा कृष्ण द्रौपदीला
माझ्या भावासाठीच मी
जीव माझा कुर्बान केला।।
माझ्या भावाला मिळावे
सुख आरोग्य हे छान
त्याच्यासाठी मी मागते
ईश्वराकडे मी वरदान।।
सुखी ठेव देवराया
माझ्या प्रिय भावाला
माझेही सर्व आयुष्य
खरोखर मिळो त्याला।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















